Seena Bhogawati River Link Project Pudhari
सोलापूर

Seena Bhogawati River Link Project : उजनीचे पाणी भोगावतीत आणण्यासाठी शासन सकारात्मक

सीना-भोगावती नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे

पुढारी वृत्तसेवा
काशीनाथ क्षीरसागर

वैराग : उजनी धरणातील पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी भोगावती नदीत आणण्याचा प्रस्तावित उजनी-भोगावती एक्सप्रेस लिंक कॅनॉल प्रकल्प या भागासाठी वरदान ठरू शकतो. सीना-भोगावती नदीजोड प्रकल्पाच्या तांत्रिक सर्वेक्षणाच्या दृष्टीने शासनस्तरावर सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हे दोन्ही प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्याकडे पाठविले आहेत, अशी माहिती डॉ. प्रकाश कादे यांनी दिली.

बार्शी, मोहोळ, उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यांत सध्या तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीने या भागातील पाण्याची गरज पुन्हा अधोरेखित केली आहे. उजनीचे अतिरिक्त पाणी भोगावती नदीत आणण्याचा हा प्रस्ताव केवळ नदीजोड प्रकल्पापुरता मर्यादित नसून भविष्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

एक्सप्रेस लिंक कॅनॉल साकारल्यास हजारो हेक्टर जमीन नव्याने ओलिताखाली येण्याची शक्यता असून शेतीला शाश्वत पाण्याचा आधार मिळू शकतो. या संदर्भात ४ मार्च २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील आणि आ. सुभाष देशमुख यांच्याकडे प्रा. डॉ. प्रकाश कादे व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. यामध्ये दोन पर्यायी प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली होती.

प्रकल्पाची व्यवहार्यता पाहावी

पहिल्या पर्यायानुसार उजनी धरणातील कंदर परिसरातून इर्ले किंवा यावली येथील भोगावती नदीपर्यंत ५८.४६ किलोमीटर लांबीचा एक्सप्रेस लिंक कॅनॉल प्रस्तावित आहे. तर दुसऱ्या पर्यायात माढा तालुक्यातील रिधोरे येथून बार्शी तालुक्यातील यावलीपर्यंत २३.९३ किलोमीटर लांबीच्या सीना-भोगावती नदीजोड प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीच्या अनुषंगाने आ सुभाष देशमुख यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार जलसंपदा मंत्र्यांनी याबाबतचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे.

या दोन्ही पर्यायी मार्गांचे तांत्रिक सर्वेक्षण करून पाण्याची उपलब्धता, भौगोलिक उंची, जलवाहतुकीची शक्यता आणि आर्थिक व्यवहार्यता तपासणे अपेक्षित आहे. प्रकल्प प्रत्यक्षात साकारल्यास चार तालुक्यांतील हजारो हेक्टर जमीन नव्याने ओलिताखाली येण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासही मोठी मदत होऊ शकते.
- प्रा. डॉ. प्रकाश कादे, भूगोल अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT