Gold Silver Price Today file photo
सोलापूर

Gold Silver Price: सोन्याच्या दरात ४ हजार २०० रुपयांची घसरण, चांदी वाढली

सोने स्वस्त झाल्यानंतरही बाजारात ग्राहकांची अपेक्षित गर्दी दिसून आली नाही

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील सराफा बाजारात गुरुवारी (दि. २५) सोन्याच्या दरात लक्षणीय घसरण झाली. तर चांदीच्या किमती मात्र वाढल्या. सोने स्वस्त झाल्यानंतरही बाजारात ग्राहकांची अपेक्षित गर्दी दिसून आली नाही.

बुधवारच्या तुलनेत गुरुवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल ४ हजार २०० रुपयांची घसरण झाली. बुधवारी प्रतितोळा १ लाख ४५ हजार २०० रुपये असलेले २४ कॅरेट सोने गुरुवारी १ लाख ४१ हजार रुपयांवर आले. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३३ हजार ८०० रुपयांवरून घसरून १ लाख २९ हजार ८०० रुपये प्रतितोळा इतका झाला. त्यामुळे सोन्याची खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे, चांदीच्या दरात वाढ झाली. बुधवारी प्रतिकिलो २ लाख २४ हजार रुपये असलेली चांदी गुरुवारी ३ हजार रुपयांनी वाढून २ लाख २७ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. आगामी काळातही बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

जागतिक आर्थिक घडामोडी, विविध देशांतील तणावपूर्ण परिस्थिती आणि मंदीच्या शक्यतेमुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. दररोज बदलणाऱ्या किमतींमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी दर आणखी कमी होतील, या अपेक्षेने अनेक ग्राहक खरेदी टाळत आहेत. त्यामुळे सराफा बाजारात अपेक्षित गर्दी नाही.
नितीन वेरणेकर, सराफ व्यापारी, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT