AI Ambedkar exhibit 
सोलापूर

AI Ambedkar exhibit: जीएम संस्थेतर्फे साकारणार ‌‘एआय आंबेडकर‌’ देखावा !

थ्रीडी नकाशा आणि डेटा मॉडेलच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीचा आराखडा

पुढारी वृत्तसेवा
दीपक शिराळकर

सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा जपण्यासाठी सन 2000 मध्ये जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेची स्थापना संस्थापक बाळासाहेब वाघमारे आणि आधारस्तंभ दत्ता वाघमारे यांनी केली.

गेल्या 26 वर्षांपासून ही संस्था सोलापूर शहरात शैक्षणिक, कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात निरंतर सक्रिय आहे. दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून संस्था आपली सामाजिक बांधिलकी जपत आहे. यंदा जयंती मिरवणुकीत संस्थेमार्फत एआय आंबेडकर काळाच्या पलीकडे दृष्टी हा नाविन्यपूर्ण देखावा सादर केला जाणार आहे. हा देखावा डॉ. बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचा आणि आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा एक अनोखा संगम आहे.

महामानवाचे विचार आजच्या डिजिटल युगातही किती दिशादर्शक आहेत, हे या तंत्रज्ञानाद्वारे प्रभावीपणे मांडले आहे. सामाजिक कार्याचा वारसा जपत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बाबासाहेबांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा कल्पक प्रयत्न यंदा मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटी व शर्तीचे पालन करूनच साऊंड लावण्यात येणार आहे.

विचारांची प्रगत क्रांती

हा देखावा डॉ. बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम आहे. यात संविधान हा देशाचा कोअर प्रोग्रॅम, तर थ्रीडी नकाशा विकासाचे डेटा मॉडेल महामानवाचा समाज, अर्थव्यवस्था आणि न्यायाचा अभ्यास हाच खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्मितीचा अचूक आराखडा असून, ही आजच्या युगातील विचारांची प्रगत क्रांती आहे.

युवा सक्षमीकरणाचा वारसा

जीएम संस्था स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट, तर बेरोजगारांना कर्ज व रोजगार मिळवून देण्यात अग्रेसर आहे. महिलांसाठी शिबिरे आणि महापरिनिर्वाण दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. तसेच रमाई आवास योजनेतून गरजूंना हक्काची घरे मिळवून देत संस्था सामाजिक क्रांती घडवत आहे.

डॉ. बाबासाहेबांचे विचार विज्ञानावर आधारित होते. म्हणूनच यंदा आम्ही एआय तंत्रज्ञानाद्वारे त्यांची दूरदृष्टी मांडत आहोत. महामानवाचा राष्ट्रनिर्मितीचा आराखडा नव्या पिढीपर्यंत आधुनिक पद्धतीने पोहोचवणे, हाच आमचा मुख्य उद्देश असून यातून वैचारिक क्रांती घडवण्याचा आमचा मानस आहे.
-बाळासाहेब वाघमारे संस्थापक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT