सोलापूर : बाळे येथील खंडोबा यात्रेनिमित्त प्रमुख मानकर्यांच्या घरोघरी आणि खंडोबा मंदिरात सोमवारपासून (दि. 2) घटस्थापना करण्यात येणार आहे. पाच दिवस उपवास केल्यानंतर चंपाषष्ठीदिवशी भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखल्यानंतर शनिवारी (दि. 7) काकडा आरती, अभिषेक, महापूजा, पालखी सोहळ्याने यात्रेस सुरुवात होणार आहे. पुढील चार रविवार यात्रेनिमित्ताने जय मल्हारचा जयघोष होणार आहे.
श्री क्षेत्र खंडोबा यात्रेची सुरुवात सोमवारपासून होणार आहे. यात्रेची तयारी मंदिर समितीच्या वतीने पूर्ण झाली आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत. मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी होणार असल्याने महिलांच्या सुरेक्षेची विशेष काळजी घेतली गेली आहे. मंदिरातील गाभार्याची फुलांनी सजावट करण्यात आली आहे. महिला आणि पुरुष दर्शन रांग स्वतंत्र करण्यात आली आहे. सोमवारपासून घरोघरी घट बसवले जाणार आहेत. मंदिरातही पहाटे घटस्थापना केली जाणार आहे. या कालावधीमध्ये पाच दिवस उपवास करून पाचव्या दिवशी भरीत रोडग्याचा प्रसाद दाखवल्यानंतर उपवास सोडून घट उठवल्यानंतर शनिवारी (दि. 7) चंपाषष्ठीपासून यात्रेस सुरुवात होणार आहे.
शनिवारी चंपाषष्ठीदिवशी सकाळी काकडा आरती, अभिषेक, महापूजा, अभिषेक आणि रात्री घोडा व नंदीध्वजासह पालखी सोहळा होणार आहे. त्यानंतर 8, 15,22,29 अशा चार रविवारी यात्रा भरणार आहे. पाच डिसेंबरला बांगरष्ठीदिवशी सर्व मानकर्यांना महाप्रसाद देऊन यात्रेची सांगता होणार आहे.
यात्रेची तयारी मंदिर समितीकडून पूर्ण झाली आहे. भाविकांसाठी महापालिकेच्या माध्यमातून बसची सोय करण्यात आली आहे. पार्किंगसाठी जागा फायनल केली आहे. यात्रा काळात मंदिर 24 तास चालू राहणार आहे. भाविकांची गैरसोय होणार नाही यांची दक्षता घेतली आहे.विनय ढेपे, चेअरमन, खंडोबा देवस्थान, बाळे.