माळशिरस : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 30 जून व श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 1 जुलै रोजी माळशिरस तालुक्यात येत आहे. या वारकरी, भाविक, विक्रेते यांना भोजन व्यवस्थेकरिता गॅस सिलेंडरची आवश्यकता असते. त्यांना वेळेवर गॅस मिळण्यासाठी पालखी तळ, पालखी मार्गावर विविध ठिकाणी गॅस विक्रीची ठिकाणे निश्चित केली असल्याची माहिती तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी दिली.
यावेळी पुरवठा निरीक्षण अधिकारी रविकिरण शेट, पुरवठा निरीक्षक सुशांत केमकर आदी उपस्थित होते. 30 जून ते 3 जुलै या कालावधीत गॅस पुरवठा केला जाणार आहे. यासाठी तालुक्यातील गॅस वितरकांना ठिकाणे, वेळ निश्चित करून दिली आहेे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. दिनांक, ठिकाण व वेळ पुढील याप्रमाणे ठरवून देण्यात आली आहे. गॅसचे वितरण विविध वितरकांकडून केले जाणार आहे. काही अडचण आल्यास प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
दि. 30 जून रोजी धर्मपुरी पालखी तळ शेजारी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, दि. 30 जून रोजी दाते पेट्रोलपंप नातेपुते दुपारी 2 पासून रात्री 2 वाजेपर्यंत, दि.1 जुलै रोजी शहा धारशी जीवन पेट्रोलपंपाजवळ सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत. तर ईश्वरा पेट्रोलपंप माळशिरस सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत. दि.2 जुलै रोजी पुष्कराज पेट्रोलपंप वेळापूर सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत, दि.3 जुलै रोजी बोंडले दूध डेअरी शेजारी (ओढ्याजवळ) सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत.