सांगोला : सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील मंगल कार्यालय येथील सोने चोरी तसेच ट्रॅक्टर चोरी करणार्या टोळीस जेरबंद करुन 4 लाख 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भीमराव खंणदाळे यांनी दिली.
सांगोला पोलीस ठाणे हद्दीत सांगोला शहर व ग्रामीण भागातील चोरी घटनांना आळा घालण्यासाठी व गुन्हे उघडकीस आणण्याकरीता सांगोला पोलीस ठाण्याकडील तपास पथक हे मुक्ताई मंगल कार्यालय शिवणे (ता. सांगोला) येथे दाखल झाले. लग्नकार्याच्या वेळी फिर्यादी विद्या अविनाश लैंडवे, रा. आंधळगाव (ता. मंगळवेढा) यांच्या पर्समधून सुमारे 23 ग्रॅम वजनाचे 90 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरी झाले होते. याचा तपास करत असताना याच चोरी प्रकरणातील आरोपींनी कडलास नाका येथील ट्रॅक्टर चोरी केल्याचे दिसून आले.
कडलास नाका सांगोला येथे लावण्यात आलेला ट्रॅक्टर नं. (एम. एच. 45 ए. क्यू. 6823) चोरी झाला आहे. याबाबत फिर्यादी रविंद्र विठ्ठल महंकाळ रा. कडलास यांनी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल होता. या घडलेल्या घटना उघडकीस आणण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगोला पोलिसांना निर्देश दिले होते. या अनुंशगाने सांगोला पोलीस या गुन्हयाचा तपास करीत होते. तांत्रिक माहिती व सी. सी. टी. व्ही. फुटेजच्या आधारे मंगल कार्यालय येथे चोरी करणारे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याला ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याचे नाव नईम अमीर तांबोळी, रा. दिघंची (ता. आटपाडी) सध्या रा. कडलास रोड खंडागळे हॉस्पीटलजवळ सांगोला, सुहानी पिराजी सावंत, रा. भिमनगर सांगोला यांची नावे निष्पन्न झाली. त्यातील आरोपी नईम अमीर तांबोळी यास अटक करण्यात आली आहे. तसेच नईम तांबोळी याने पोलीस चौकशी दरम्यान कडलास नाका सांगोला येथुन फिर्यादी रविंद्र विठ्ठल महंकाळ रा. कडलास यांचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर हा त्याचा मित्र बबलु भोसले रा. परीटगल्ली, सांगोला याच्यासोबत मिळून चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपी नईम तांबोळी याच्याकडून हा ट्रॅक्टर व सोन्याचे गंठण असा सुमारे 4 लाख 90 हजार रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विक्रांत गायकवाड, पो.नि. भिमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अस्लम काझी, पोना बाबासाहेब पाटील, पो.ना. वाकीटोळ, पोकॉ लक्ष्मण वाघमोडे, युसूफ पठाण यांनी केली आहे.