FDA Inspection 
सोलापूर

FDA Inspection: गणेशोत्सवात कारवाईसाठी एफडीए सज्ज

आजपासून मिठाई, खवा, पनीर, तूप, दुधाच्या तपासणी मोहिमा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळविरोधी कारवाईला सुरुवात केली आहे. मिठाई, मोदक, खवा, पनीर, तूप, दूध, खाद्यतेल, बेसन तसेच सुका मेवा यांसारख्या पदार्थांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

गणेशोत्सव काळात गणेश मंडळांकडून तसेच घरगुती पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रसाद व मिठाई तयार केली जाते. या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी केली जात आहे. संशयास्पद किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ आढळल्यास त्यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

अन्न प्रशासनाच्या मोहिमेत केवळ मिठाई दुकानांपुरते मर्यादित न राहता उत्पादन केंद्रे, वाहतूक व्यवस्था, दुकाने, गोदामे तसेच ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवरही लक्ष ठेवले जाणार आहे. सणाच्या कालावधीपूर्वीच तपासणी सुरू करून त्यानंतरही नमुन्यांच्या अहवालांचा पाठपुरावा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी शक्यतो परवानाधारक दुकानातूनच मिठाई व इतर खाद्यपदार्थ खरेदी करावेत. पॅकबंद पदार्थ घेताना उत्पादन तारीख, वापरण्याची अंतिम तारीख, लेबल आणि संबंधित परवाना तपासावा. संशयास्पद पदार्थ आढळल्यास अन्न प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोलापूर विभागाच्या अखत्‍यारित नऊ अन्न सुरक्षा अधिकारी असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्नातील भेसळ रोखण्यासाठी नऊ पथके तैनात करण्यात आली आहे. तपासणी मोहिमेस आज सोमवारी सात जूनपासून सुरु केली जाणार आहे.
- साहेबराव देसाई साहाय्यक आयुक्त अन्न प्रशासन विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT