सोलापूर : गणेशोत्सवात बाप्पाचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकीला बॅन्जोच्या तालाची रंगत असते. यंदा पोलिसांनी घालून दिलेल्या नियमावलीनुसार बॅन्जो पथकांचे बुकिंग सुरू झाले आहे. गेल्या वर्षी बॅन्जो वादनावर बंदी असल्याने बुकिंग झाले नव्हते. मात्र, यंदा पोलिसांनी नियमांच्या अधीन राहून परवानगी दिल्याने बॅन्जो पथकांकडे मंडळांकडून विचारणा सुरू झाली आहे.
पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी डीजे आणि वादक संघटनांची बैठक घेऊन ध्वनिक्षेपकाची मर्यादा आणि नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार बॅन्जो संघटनेने एक बेस, एक टॉप या पद्धतीने बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.
लेझीमचा सराव, गणेश आगमन मिरवणूक आणि विसर्जन मिरवणूक यासाठी एकत्रित पॅकेज सुमारे ७० हजार रुपयांपर्यंत आहे. यामध्ये तीन वादक, एक पॅड वादक आणि मिरवणुकीसाठी वाहनाचा समावेश आहे. घरगुती गणपतीच्या मिरवणुकीसाठी ५ हजार ते २५ हजार रुपये आकारले जात आहेत.
रकमेनुसार पथकातील वादकांची संख्या ७ ते ८ पर्यंत असते. शहरात सध्या ५० ते ५५ बॅन्जो पथके असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष भगवान कांबळे यांनी सांगितले. यंदा दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसून जिल्हाभरातील गणेश मंडळांकडून बुकिंग होत असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत डीजेमुळे बॅन्जो व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांनुसार बुकिंग घेत असून, त्याचे पूर्णपणे पालन केले जात आहे. यंदा गणेश मंडळांकडूनही बॅन्जो पथकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा आहे.- भगवान कांबळे, उपाध्यक्ष, सोलापूर बॅन्जो संघटना