सोलापूर : बुद्धीची देवता, लहान थोरांपासून सर्वांचे आवडते दैवत श्री गणरायाच्या आगमानासाठी सोलापूरवासीय सज्ज झाले आहेत. शहरातील प्रमुख चौकांपासून गल्लीबोळातील लहान मंडळांचे मंडप गणरायाची आतुरतेने वाट पहात आहेत. शहरात सुमारे दीड हजार सार्वजनिक मंडळाच्या श्रीगणेशाची स्थापना होणार आहे. घरी बाप्पा येणार म्हणून बच्चे मंडळीही खुशीत आहेत.
गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी सोलापुरातील तयारी पूर्ण झाली आहे. यंदा गणेशमूर्तीचे दर वाढले असले तरी खर्चाची पर्वा न करता सुबक आणि सुंदर मूर्ती घरी आणण्याला प्राधान्य दिले आहे. गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी वेगवेगळे देखावेही घराघरात तयार झाले आहेत. बाजारपेठेतही मोठी उलाढाल पहायला मिळत आहे.
सोलापूर शहरात एक लाखाहून अधिक घरगुती श्रीगणेशाची स्थापना होते. तसेच सुमारे दीड हजाराहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळे श्रीगणेशाची स्थापना करणार आहेत. शहरात आठ सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळे आहेत. या महामंडळांतर्गत दीड हजार मंडळे कार्यरत आहेत. त्यातील 350 मंडळे अनंत चतुर्दशी मिरवणूक काढतात. काही मंडळे देखावे सादर करतात त्याची तयारही अंतिम टप्प्यात आली आहे. एकूणच गणेशाच्या आगमनासाठी सोलापूरकर सज्ज झाले आहेत.
लेझिम अन् संबळचा आवाज घुमणार
सोलापुरातील गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे लेझिमचा खेळ. शहरातील शंभरहून अधिक मंडळांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा लेझिमचा खेळ सादर केला जातो. त्यासाठी महिनाभरापासून सराव सुरु आहे. बॅन्जो, हलगी, संबळ आणि सनईच्या तालावरील सोलापुरी लेझिम संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. काही मंडळे डीजे लावतात परंतु यंदा नो डीजे मोहिमेने जोर धरल्याने त्याला कितपत प्रतिसाद मिळतो हे मिरवणुकीनंतरच कळेल.
यंदा 11 दिवसांचा गणेशोत्सव
यंदाचा गणेशोत्सव 11 दिवसांचा असल्याची माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली. घरगुती श्रीगणेशाची स्थापना पहाटे 4.50 पासून दुपारी 1.53 पर्यंत करता येईल त्यासाठी विशिष्ट मुहूर्ताची गरज नाही. घरगुती गणेशमूर्ती वितभर असावी, मूर्ती शाडूची अथवा मातीची असावी. सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापना मध्यान्हानंतरही करता येणार आहे. सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे.