सोलापूर

Solapur News: गणेश बिल्डर्स नं. ३ च्या रस्त्याचा वाद पुन्हा पेटला

खा. प्रणिती शिंदे आक्रमक; ठिय्या आंदोलन, रस्ता दिल्याशिवाय उठणार नसल्याची भूमिका

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : जुळे सोलापुरातील रुबीनगर येथील गणेश बिल्डर्स नं. तीन व अन्य वसाहतीसाठी असलेला रस्ता तसेच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेजलाईन शेजारील प्लॉटधारकाने उखडल्यामुळे वाद पेटला आहे. या वादात खा. प्रणिती शिंदे यांनी रविवारी थेट उखडलेल्या रस्त्याच्या खड्ड्यात बसून ठिय्या आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली.

जागेतील रस्त्याच्या वाटेवरून नागरिक आणि संबंधितांकडून आक्षेप नोंदविला जात असून, हा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित असल्याचेही सांगण्यात येत आहे. जोपर्यंत वसाहतीमधील नागरिकांना वाट मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, अशी ठाम भूमिका खा. शिंदेसह नागरिकांनी घेतली आहे.

याबाबत महापालिकेकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत स्वातंत्र्यदिनादिवशी महापालिकेसमोर रहिवाशांनी आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आत्मदहन नसले तरी घोषणाबाजी करत रहिवाशांनी आंदोलन केले. त्याकडे पालकमंत्री, महापालिका आयुक्त, स्थानिक आमदार, महापौर, नगरसेवक कोणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे रहिवाशांनी खा. शिंदे यांच्याशी संपर्क करत याबाबत निवेदन दिले. त्यांनी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता त्यांना गांभीर्य लक्षात आल्याने थेट रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केले.

खा. शिंदे यांनी नागरिकांना रस्ता मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याने हा वाद ऐरणीवर आला आहे. प्रशासन आणि संबंधितांकडून यावर काय तोडगा काढला जातो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, मनोज यलगुलवार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT