सोलापूर : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गकडरी हे आज, गुरुवारी (दि. 14) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, ते पंढरपूर, अक्कलकोट येथे विकास कामांची पाहणी करणार असून त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या दौऱ्यात ताफ्यातील वाहनांत 50 टक्के कपात करण्याची सूचना गडकरी यांनी प्रशासनास केली असून, त्यानुसार कपात करण्यात येणार आहे. त्यांच्या सोबत प्रशासनातील अधिकाऱ्यांची केवळ तीन वाहने असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा प्रभावित झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल, डिझेलचा कमीत कमी वापर करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गडकरी यांनीही प्रतिसाद दिला आहे.
दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांचे एक, प्रांताधिकारी तहसीलदारांत मिळून एक आणि राष्ट्रीय महमार्ग विभागाचे एक वाहन अशी तीन वाहनेच असतील. अधिकाऱ्यांनी शक्य असेल तर बैठका व्हीसीद्वारे घ्याव्यात, इलेक्ट्रिक वाहने, सार्वजनिक वाहतुकीने कार्यालयात यावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांचा परदेश दौरा रद्द
इंधन बचतीसाठी अधिकाऱ्यांचा नियोजित सर्व परदेश दौरे रद्द करण्याचा आदेश आहे. याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांनी गुरुवारी व्हीसी घेतली असून, तशा सूचना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.