सोलापूर

Tuljapur news: तुळजापूर आगारातील इंधन पुरवठा बंद झाल्याने प्रवाशांचा खोळंबा

परिवहन मंत्र्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या आगाराचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अखत्यारीत येणाऱ्या तुळजापूर बस आगारात गेल्या महिनाभरापासून इंधन टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचा फटका देवी दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना बसत असून सध्या सर्वच गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.

तुळजापूर आगारात एकीकडे भंगार झालेल्या गाड्या आणि उपलब्ध डिझेल पंपाचा करार संपल्याने सध्या येथील आगारात डिझेलचा ठणठणाट प्रकर्षाने जाणवत आहे.परिणामी येथून सुटणाऱ्या सर्व बसगाड्या डिझेल भरण्यासाठी धाराशिवच्या आगारात जात आहेत.यामध्ये कर्मचाऱ्यांचा वेळ,त्यांच्या भत्त्याचा भुर्दंड आणि इंधनाचे विनाकारण ज्वलन होऊन तोट्यातील महामंडळाला मोठी आर्थिक झळ बसत आहे.

सध्या इंधनाच्या तुटवड्यामुळे प्रवाशांचा किमती वेळ खर्ची पडत असून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत.अनेक गाड्या उशीर झाल्याने रद्द करण्याची नामुष्कीही एस.टी.अधिकाऱ्यांवर ओढवत आहे.ग्रामीण भागात धावणाऱ्या सर्वच गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून सर्वच गाड्या अर्धा ते एक तास उशिरा धावत आहेत.परिणामी कंटाळलेल्या प्रवाशांना खासगी वाहनांची शोधाशोध करावी लागत आहे.तीर्थ क्षेत्राचे ठिकाण असलेल्या तुळजापूर आगारात एकही ‌‘शिवाई‌’ बस उपलब्ध नाही,परिणामी वातानुकूलित आणि पर्यावरण पूरक गाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.

देवी दर्शनार्थ येणारे भाविक वैतागले दरम्यान, तुळजापूर हे तीर्थ क्षेत्राचे ठिकाण असल्याने येथे येणाऱ्या सामान्य भाविकांना जा-ये करण्यासाठी महामंडळाच्या बसेसवरच अवलंबून राहावे लागते.सध्या गाड्यांना इंधन पुरवठा बाहेरून करावा लागत असल्याने दूर-दूरच्या प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांची हेळसांड आणखी किती दिवस राहील याचे उत्तर कुणाकडेच नसल्याने कर्मचाऱ्यांसह बसचा असंख्य प्रवाशी चांगले दिवस येण्याची प्रक्रिया वाट पाहताना दिसत आहेत.परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईक यांनी हा तिढा लवकर सोडवावा अशी मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT