टेंभुर्णी : मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलतोय असे सांगून अज्ञात आरोपींनी नियोजनबद्ध कट रचून व संगनमताने केळी व्यापाऱ्यांस 25 लाखास गंडविल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.‘फोन पे’ च्या माध्यमातून व ‘आर्टिजीएस’ च्या माध्यमातून ही ऑनलाइन फसवणूक केल्याची तक्रार सायबर क्राईम पोर्टलवर दाखल करण्यात आली आहे.
विजय सूर्यकांत माने (वय 42, रा.कंदर (ता.करमाळा) यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. विजय माने हे कंदर परिसरात केळीचा व्यवसाय करीत आहेत. दि.21 नोव्हेंबर रोजी 12.57 या वेळेत विजय माने यांच्या मोबाईल नंबरवर फोन आला. पलीकडून एक व्यक्तीने सांगितले की, तुमच्या मोबाईलवरुन लोकांना व्हिडीओ व फोटो मेसेज पाठविले आहेत. त्याची तक्रार आमच्या मुंबई क्राईम ब्रँच या कार्यालयास रजिस्टर झाली असल्याचे सांगितले. अशा पध्दतीने सतत भीती दाखवून ‘फोन पे’ व ‘आर्टिजीएस’ च्या माध्यमातून एकूण 25 लाख सात हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले.