पंढरपूर : देशाचे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी गुरुवारी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याप्रसंगी मंदिरात सुरु असलेल्या जतन व संवर्धनाच्या कामाची माहिती दिली. त्याचबरोबर मंदिर समितीच्यावतीने देवेगौडा यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, एच.डी. देवेगौडा यांनी पंढरपुरात आल्यानंतर सर्वप्रथम भाविक ज्या प्रमाणे चंद्रभागा नदीला जावून स्नानाला महत्व देतो त्याच पध्दतीने देवेगौडा यांनी चंद्रभागा नदीपात्रात जावून हात पाय धुतले. जल प्राशन केले. चंद्रभागेचे दर्शनही घेतले. चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिरात जावून दर्शन घेतले.
यावेळी पुंडलिक मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाबा अधटराव यांनी सत्कार केला. यानंतर देवेगौडा यांनी श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे सहकुटूंब दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील (काका) व कर्मचारी उपस्थित होते.