सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा काँग्रेसचे माजी आ. दिलीप माने यांचा भाजपातील बहुप्रतीक्षित प्रवेश अखेर मुंबईतील भाजप कार्यालयात झाला. यामुळे सोलापूर शहरासह दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकारणाचे समीकरण बदलणार आहे.
माने यांच्या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध करणार्या दक्षिण सोलापूरचे भाजपचे आ. सुभाष देशमुख यांना हा झटका मानला जात आहे. तसेच मानेंच्या भाजप प्रवेशामुळे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलीप माने यांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह आदी उपस्थित होते.
दिलीप माने यांच्यासह काँग्रेसचे माजी नगरसेवक जयकुमार माने, दादाराव माने, नागेश ताकमोगे, पृथ्वीराज माने, धनंजय भोसले, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रथमेश पाटील, श्रीकांत मेलगे पाटील, सतीश दरेकर यांचाही भाजपात प्रवेश झाला. दिलीप माने यांचा सहकार क्षेत्रातील राजकारणात वर्चस्व असून, सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचेसभापती आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा दूध संघ, खरेदी विक्री संघ, लेबर फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून काम केले आहेत.
त्यामुळे आगामी काळातील जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील सोसायटीचे बळ भाजपच्या मागे उभे राहणार आहे.याआधी माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवून आंदोलन केला होता. आ.सुभाष देशमुख यांनी देखील कार्यकर्त्यांचा विरोध असल्याचे सांगितले होते.
परंतू नुकतेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माने यांचा पक्ष प्रवेश आ. सुभाष देशमुख यांच्या निर्णयावर केल्याचे जाहीर केले होते.आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने यांचा प्रवेश भाजपासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. मागील काही दिवसांपासून दिलीप आणि यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती मात्र त्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे.
आ. देशमुखांना पक्षांतर्गत आव्हान
जयकुमार माने हे काँग्रेसचे माजी नगरसेवक असून, प्रभाग क्रमांक 26 क मधून महापालिका निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. नागेश ताकमोगे यांनीही निवडणुकीची तयारी केली आहे. दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाने आ. सुभाष देशमुख यांच्यासमोर पक्षातंर्गतच आव्हान उभे राहिले आहेत.