सोलापूर

Sidramappa Patil: अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांनी गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने सोलापुरातील खासगी रुग्णालयात वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

पुढारी वृत्तसेवा

अक्कलकोट : तालुक्याचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सहकारातील खंबीर नेतृत्व सिद्रामप्पा पाटील यांनी गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने सोलापुरातील खासगी रुग्णालयात वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने अक्कलकोट तालुक्यासह राजकीय, सामाजिक अन्‌‍ सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अक्कलकोट तालुक्यातील कुमठे येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सिद्रामप्पा पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. सिद्रामप्पा पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत मोठा संघर्ष उभा करून अक्कलकोट तालुक्यात भाजपची बांधणी करून तालुका भाजपमय केला. सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य हे सामान्यजन आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारे, मोठा आधार देणारे होते. शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन आयुष्यभर त्यांच्यासाठी झटणारे एक खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशी भावना अनेकांनी व्यक्तकेली.

गावच्या सरपंचपदापासून पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा बँकेचे सलग 35 वर्षे संचालक एकवेळ उपाध्यक्ष तसेच श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, मार्केट कमिटी सभापती, तालुक्याचे आमदार असा सिद्रामप्पा पाटील यांचा कर्तृत्ववान राजकीय प्रवास राहिला. अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. या दरम्यान अनेक दिग्गज नेत्यांशी सिद्रामप्पा पाटील यांची जवळीक राहिली. भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात. शेवटपर्यंत सिद्रामप्पा पाटील यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य अखंडपणे सुरु होते. गेल्या काही दिवसापासून त्यांना आजाराने ग्रासले होते. दरम्यान सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु असताना रात्री 8 वाजून 17 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT