मोहोळ : ‘सुया घे, बिबं घे, पिना घे...’ असे ओरडत प्रेक्षकांमधून कृष्णाई उळेकर यांनी मंचावर प्रवेश करत सर्वांना अचंबित केले. निमित्त होते वडवळ (ता. मोहोळ) येथे श्री नागनाथ यात्रेनिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे.
या महोत्सवाचे उद्घाटन आकाशबुवा शिवपुजे व पोपटबुवा खर्गे महाराज यांच्या हस्ते झाले. ‘रंग भारुडाचे वारी लोककलेची’ या कृष्णाई उळेकर प्रस्तुत कार्यक्रमाने सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी यात्रा कमिटीचे पदाधिकारी राहुल मोरे ,सचिन चव्हाण, श्रीकांत शिवपुजे, शाहू धनवे ,सरपंच जालिंदर बनसोडे, धनंजय मोकाशी, दादासाहेब पाटील, मोहोळ पोलीस स्टेशनचे पो.कॉ.शिंदे साहेब व ग्रामस्थ उपस्थित होते. महेश कोटीवाले यांनी प्रास्ताविक केले.
‘सुया घे ,बिबं घे ,पिना घे’ असे ओरडत प्रेक्षकांमधून कृष्णाईने मंचावर प्रवेश करत सर्वांना अचंबित केले. बुरगुंडा होईल गं या भारुडाच्या माध्यमातून जीवनात ज्ञानाचे महत्त्व किती आहे हे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष आपल्या विद्वत्तेनेच महान बनल्याची उदाहरणे तिने भारुडातून दिली. सोळावं वरीस धोक्याचं नाही तर शिकण्याचं आहे शिकून मोठे व्हा असा मौलिक संदेश सुद्धा या भारुडातून दिला. नव्या तंत्रज्ञानाची कास धरणारा शेतकरी नवराच हवा असे सांगत शेतकर्यांच्या व्यथा वेदना मांडल्या. शेतकरीच कसा जगाचा तारणहार आहे हे भारुडातून सांगितले. कट्टयावर चकाट्या पिटत बसण्यापेक्षा शेताच्या बांधावर जाण्याचा सल्लाही कृष्णाईने तरुणाईला दिला. जिजाऊच नाही जन्मली तर शिवाजी कसे जन्माला येतील असा सवाल करत स्त्रिया वरील अन्याय अत्याचार थांबायला हवेत असाही प्रबोधनात्मक संदेश दिला.
शाहीर बाळासाहेब मालुसकर (पुणे ), रमेश खाडे (सोलापूर ), प्रभाकर उळेकर आणि भाऊकांत गोंधळी या सहकलाकारांनी कृष्णाईच्या भारुडाला उत्तम साथ दिली. भैरवनाथ कानडे यांनी प्रत्येक भारुडाला साजेसे निवेदन करत ‘रंग भारुडाचे वारी लोककलेची’ हा कार्यक्रम खुलवला. कार्यक्रमास महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन बापूसाहेब दळवे व भिमराव मोरे यांनी आभार मानले.
बेटी बचाव हा नारा की धमकी असा खडा सवाल करत आज भारतात स्त्री सुरक्षित नाही, ही शरमेची गोष्ट आहे. ज्या छत्रपती शिवरायांनी आपल्या राज्यात स्त्रियांचा सन्मान केला तसा सन्मान आज समाजामध्ये का होत नाही. मुलीच्या जन्माचं स्वागत व्हायला हवं. सावित्रीबाईंना दिलेल्या शिक्षणामुळे आज स्त्री राष्ट्रपती झाली. चंद्रावर जाऊन आली तरीही मुलगी जन्माला आली की आई-बापांना आनंद का होत नाही? असा प्रश्न कृष्णाई उळेकर यांनी उपस्थित केला.