सोलापूर : राज्य शासनाने नुकतेच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली असून, त्यासाठी 30 सप्टेंबर 2025 ही थकीत कर्जाची अंतिम तारिख निश्चित केली आहे. त्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर 2025 मध्ये पूरबाधित, अतिवृष्टीबाधित जिल्ह्यातील शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत.
महायुती सरकार सत्तेत आल्यापासून कर्जमाफीच्या निर्णयाकडे शेतकरी डोळे लावून बसले होते. कर्जमाफीसाठी समिती गठीत करण्यात आली. त्यानुसार 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली.
कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ देण्यासोबत राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी, यासाठी समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेतला जाणार असल्याची शासनाने भूमिका जाहीर केली आहे. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमचे कर्जमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प असून समितीच्या शिफारसीनुसार दीर्घकालीन उपाययोजना केल्या जात असल्याचेही शासनाने जाहीर केले असले तरी नुकसानग्रस्त पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला जाणार आहे.