सोलापूर : पाच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या अनुसूचित जाती जमातीतील कुटुंबातील गंभीर आजाराने पीडित रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. गंभीर आजारांवरील महागड्या उपचारांने आर्थिक संकटात सापडणाऱ्या सामान्य कुटुंबांसाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही योजना केंद्र सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय सहायता योजनेच्या माध्यमातून राबवली जात आहे. चालू आर्थिक वर्षात या योजनेत सुधारणा केल्या आहेत. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती-जमाती या प्रवर्गातील गरीब रुग्णांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीची मर्यादा वाढवण्यात आली असून यात अनेक गंभीर आजारांचाही नव्याने समावेश करण्यात आला आहे.
अनुसूचित जाती-जमाती या आरक्षित प्रवर्गातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी आहे. अशा कुटुंबांतील सदस्यांना या वैद्यकीय सहाय्य योजनेचा थेट लाभ मिळणार असून, यामुळे दुर्धर आजाराने पीडित रुग्णांना वेळेत उपचार घेणे, यापुढील काळात अधिक सुलभ होणार आहे. यामुळे गरीब व गरजू रुग्णांना मदत मिळण्याची सोय झाली आहे.
ब्रेन सर्जरी व अन्य जीवघेणे गंभीर आजार- २ लाख
हृदय शस्त्रक्रिया व स्पाईनल शस्त्रक्रिया : १. ५० लाख
किडनी सर्जरी व डायलिसिस, अवयव प्रत्यारोपण : ३.५० लाख
कॅन्सर (शस्त्रक्रिया, केमो व रेडिओथेरपी): २.५० लाख
आवश्यक कागदपत्रे
संबंधित रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी स्वाक्षरी केलेले मूळ अंदाजित खर्चाचे प्रमाणपत्र, ज्यामध्ये शस्त्रक्रियेची निश्चित तारीख नमूद असावी. जात प्रमाणपत्र आणि आधार कार्ड व रेशन कार्ड यांच्या साक्षांकित छायाप्रती, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले नवीनतम उत्पन्न प्रमाणपत्र, अवयव प्रत्यारोपणाच्या बाबतीत देणाऱ्या व्यक्तीचा व नातेसंबंधाचा तपशील आणि विहित अर्ज.