मंगळवेढा : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये मंगळवेढा तालुक्यात राजकीय समीकरणे बदलली आहेत. या निवडणुकीमध्ये आता समविचारी आघाडी म्हणून भगीरथ भालके, शिवानंद पाटील यांच्या नेतृत्वात तर आ. समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणुका लढवल्या जातील, असे राजकीय चित्र दिसत आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप, राष्ट्रवादी, महायुती विरोधामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीने बाजी मारली असली, तरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये मात्र भगीरथ भालके यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन करण्यासाठी समीकरणे जुळवून आणण्याचे प्रयत्न तालुक्यातील राजकीय लोकांकडून केले जात आहेत.
काँग्रेसने खा. प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवेढ्यात झालेल्या बैठकीत पक्षाच्यावतीने निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. तरीदेखील समविचारी पक्ष आघाडीसोबत चर्चा करून निर्णय घेऊ शकतात, असे सांगितले जात आहे. या बैठकीत ग्रामीण भागातील विविध राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गतवेळी आवताडे गटाच्या मासाळ सभापती होत्या. तर दोन जागा जिल्हा परिषद ताब्यात होत्या. त्यात जिल्हा परिषद उपाध्यक्षपद आवताडे गटाने मिळवले होते. यात शीला शिवशरण यांनीदेखील समाजकल्याण सभापती म्हणून काम केले होते.
स्व.आ. भारत भालके यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक तडजोडी करून निवडणूक केली होती. आता भालके कुटुंबाकडे आमदारकी नसून ते भगीरथ भालके यांच्या राजकीय कसोटीचा काळ असणार आहे. तर आ. आवताडे यांना दोन्ही नगरपालिकेत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे ते मंगळवेढा तालुक्यातील या निवडणुकीत कितपत यशस्वी होतील, हे पाहणे गरजेचे आहे. दोन्ही राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या गोटात शांतता आहे. गुरुवारपासून अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष आता बैठका घेऊन आपल्या पक्षाच्या नेत्यांची मते जाणून घेतील, असे दिसत आहे.