सोलापूर : निर्भयपणे मतदान हेच लोकशाहीचे बलस्थान आहे. दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. लोकशाही राष्ट्र म्हणून भारताची संपूर्ण जगात ओळख आहे, अशा या राष्ट्रात मतदारांचे नेमके महत्त्व काय, त्यांना मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व काय आणि त्यांच्यामध्ये याबाबतची जागरुकता नेमकी कशा प्रकारे पसरवता येईल, या उद्देशाने मतदार दिन साजरा केला जातो.
हा दिवस 2011 पासून साजरा करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून दरवर्षी 25 जानेवारीला हा दिवस साजरा केला जाऊ लागला. एक मतदार म्हणून देशातील नागरिकाला जेव्हा हा हक्क मिळतो, तेव्हा त्यासोबत ओघाओघाने काही महत्त्वाच्या गोष्टींचा फायदाही होतो. पण, अनेकांनाच याबाबची माहितीही नसते. भारतात 18 वर्षे पूर्ण केलेल्या आणि मतदार यादीत नाव असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे. धर्म, जात, वर्ण, संप्रदाय अथवा लिंग या निकषांवर भेदभाव करत या अधिकारापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही.
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रत्येक उमेदवाराबाबतची माहिती मिळवण्याचा अधिकार मतदारांना आहे. उमेदवाराची संपत्ती, गुन्हेगारी नोंद, शैक्षणिक पात्रता अशा संदर्भातील माहिती त्यांना मिळू शकते. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्याचा अधिकार मतदारांना आहे, याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केला आहे. ज्या ठिकाणच्या मतदार यादीत मतदारांचे नाव आहे, तिथेच त्यांनी मतदान करणे अपेक्षित असते. वास्तव्याचे ठिकाण बदलल्यास मतदार सदर नव्या ठिकाणाहून मतदान कार्ड बनवून घेऊ शकतो. पण, तत्पूर्वी त्यांनी जुन्या मतदार यादीतून नाव हटवणे अपेक्षित असते.