Father-in-law dies in husband's knife attack
पोखरापूर : पुढारी वृत्तसेवा
पत्नी नांदण्यास येत नसल्याने व सासू-सासरे पत्नीला नांदण्यासाठी पाठवत नसल्याने पती निराश झालेला. त्यात न्यायालयात पोटगीचा दावा दाखल केल्याचा राग मनात धरून (३५ वर्षीय) तरुणाने धारदार चाकूने सासरा, सासू व मेहुणा अशा तिघांवर वार केले. यामध्ये सासऱ्याचा मृत्यू झाला, तर मेव्हणा व सासू जखमी झाल्याची घटना (रविवार) रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी येथे घडली.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील वडवळ स्टॉप परिसरात राहणाऱ्या मंगेश देविदास सलगर यांचे लग्न रामहिंगणी येथील बापूराव मासाळ यांची मुलगी निशा सोबत झाले होते. मात्र गेल्या अडीच ते तीन वर्षापासून निशा ही माहेरीच राहत होती. दरम्यान मंगेश सलगर हा दि. २७ रोजी रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान रामहिंगणी येथील काळे वस्ती येथे सासुरवाडीतील घरात गेला.
पत्नी निशा ही नांदण्यास येत नसल्याने आणि त्यात सासू-सासरे पत्नीला नांदविण्यास पाठवित नाहीत यामुळे तो निराश झाला होता. त्यातच न्यायालयात दाखल केलेला दावा या सर्व गोष्टीचा राग मनात धरुन धारदार चाकुने घराच्या पोर्चमध्ये झोपलेल्या सासरे बापूराव मासाळ यांच्या तोंडावर, अंगावर व पायावर चाकून भोकसून वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात सासरे ठार झाले.
तसेच फिर्यादी अभिषेक बापूराव मासाळ व त्याची आई हे बापूराव मासाळ यांना सोडविण्याकरीता मध्ये गेले असता, त्यांनाही जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने भोकसून गंभीर जखमी केले. त्यानंतर संशयित आरोपी मंगेश सलगरे याने ११२ क्रमांकावर पोलिसांना फोन करून मला या ठिकाणी मारहाण करत आहेत मला वाचवा अशी माहिती दिली. मोहोळ पोलिसांचे पथक तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले असता, त्यानेच खून करून इतर दोघांना जखमी केल्याचे दिसले. या प्रकरणी पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेत जखमींना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. मोहोळ पोलीस ठाण्यात मंगेश सलगर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी भेट देत तपासाच्या सूचना केल्या. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमने ही भेट देत गुन्ह्याच्या संदर्भाने नमुने घेतले आहेत.
कौटुंबिक वादातून जावयाने सासू-सासरे व मेव्हण्यावर चाकू हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. त्यातच सासऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मोहोळ तालुक्यात समजतात खळबळ उडाली असून, पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.