सोलापूर

Accident : सोलापूर- तुळजापूर मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात; देवदर्शन घेऊन परत निघालेले दोन युवक जागीच ठार

backup backup

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : देवीचे दर्शन घेऊन तुळजापूरहून सोलापूरच्या दिशेने येत असताना मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.2) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास एसटीने मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्याने आई व बहिणीला दर्शनासाठी घेऊन जाणारा एक १५ वर्षांचा महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाला. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा त्याच रोडवर तळे हिप्परगानजीक मेजरसाब धाब्याच्या समोर भीषण अपघात झाला.

दुचाकी व वाळूवाहतूक हायवा टिपरच्या भीषण अपघातात दुचाकी वरील दोघे युवक जागीच ठार झाले. ही घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. हा अपघात एवढा भीषण होता की दोघे उडून एकमेकापासून दूर-दुर रक्ताच्या थारोळ्यात अस्ताव्यस्त पडले होते. मोटरसायकल दुसरीकडे पडली होती. डोक्याला गंभीर इजा झाली. काळीज हेलावून टाकणारे हे भीषण दृश्य पाहण्याकरिता एकच गर्दी झाली होती.

रवींद्र नागनाथ अलशेट्टी (वय-२२) व व्यंकटसाई सूर्यप्रकाश कत्ती (वय-२४,दोघे रा. नवीन विडी कुंभारी, सोलापूर) असे या अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. एम.एच.१३.डी.क्यू. ४२१० ही अशोक लेलँड वाळूवाहतूक हायवा तुळजापूरकडून सोलापूरच्या दिशेने येत होती. दुचाकी वाहनावरून हे दोघे मयत युवक तुळजापूरहून देवीचे दर्शन घेऊन सोलापूरच्या दिशेने वेगाने निघाले होते. मेजरसाब धाबा समोर ते अचानक या मालवाहतूक ट्रिपर गाडीच्या आडवे आले. त्यामुळे या गाडीची दुचाकीस मागून जोराची धडक बसली. या अपघाताची माहिती तालुका पोलीस ठाण्याला देण्यात आली. तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय राठोड व त्यांचे पथक त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले.

मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. यावेळी बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघात झाल्याने नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. पोलिसांनी येऊन वाहतूक सुरळीत केली. शासकीय रुग्णालय सुद्धा नातेवाईकांनी व मित्रमंडळीने एकच गर्दी केली होती.

तामलवाडीजवळ एसटीच्या धडकेने दुचाकीवरील तरुण ठार ;आई व बहीण जखमी

सोलापूर : सोलापूर-मार्डी (ता.उत्तर सोलापूर) येथे देवदर्शन आटोपून दुचाकीवरून ट्रिपल सीट तुळजापूरहून येत असताना एसटीच्या धडकेने किशोरवयीन तरुण ठार तर त्याची आई आणि बहीण असे दोघी जखमी झाले. हा अपघात शनिवारी (ता.1) दुपारच्या सुमारास घडला.

योगेश संतोष बेल्लारे (वय १७ रा.सारोळा जि.लातूर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याची आई सुवर्णा बेल्लारे (वय ३५) आणि बहिण वैष्णवी संतोष बेल्लारे (वय १४ रा.सारोळा) या दोघी जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी शासकीय सोलापूरातील रूग्णालयात दाखल करण्यात आले.

योगेश बेल्लारे यांच्यासह तिघेजण आज दुपारी मार्डी येथे दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर तिघेजण दुचाकी वरून तुळजापूरकडे निघाले होते. तामलवाडीच्या अलीकडे सोलापूरहून तुळजापूर कडे जाणाऱ्या एमएच१४-बीटी-३४३० या एसटीच्या धडकेने तिघेजण जखमी झाले. त्यांना मुकुंद कांबळे (शेजारी) यांनी सोलापुरात दाखल केले असता त्यापैकी योगेश हा उपचारापूर्वी मरण पावला.

मयत योगेश बेल्लारे हा १० वीत शिकत होता. त्याच्या वडिलांचा कापडाचा व्यवसाय असल्याचे सांगण्यात आले. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT