सोलापूर : गेल्या ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत सोलापर जिल्ह्यात पडलेल्या अतिवृष्टी आणि पुर स्थितीमुळे राज्य शासनाच्यावतीने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात असून, सोलापूर जिल्ह्यातील ई केवायसीअभावी 16 हजार 15 शेतकऱ्यांचे 17 कोटी 89 लाख 72 हजार 691 रूपये प्रलंबित राहिले आहेत.
अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील बाधित 7 लाख 64 हजार 173 शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 867 कोटी 37 लाख 63 हजार 855 रूपयांची मागणी अहवालाद्वारे केली होती. 6 लाख 15 हजार 862 शेतकऱ्यांसाठी 748 कोटी 40 लाख 91 हजार 972 रूपये मंजूर झाले असून, त्यापैकी 5 लाख 67 हजार 272 शेतकऱ्यांच्या खात्यावर आजतागायत 683 कोटी 30 लाख 82 हजार 70 रूपये झाले जमा झाले आहेत.
नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने फार्मर आयडी बंधनकारक केले होते. परंतू बहुतांश शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसल्याने ते मदतीपासून वंचित राहिले होते. त्यामुळे शासनाने नियमांत शिथिलता आणून ई केवायसी बंधनकारक केले. ई केवायसीसाठी राज्य शासनाने शिबीरे घेतली आहेत.
परंतू अजून नुकसान भरपाई न दिलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे बि-बियाणे, खते घेता आली नसल्याची त्यांची खंत आहे. शासनाच्या पोर्टलवर ही रक्कम अदा झालेली दिसत आहे. मात्र केवळ ई-केवायसी, फार्मर आयडीमुळे ही रक्कम लटकली आहे. जिल्हा प्रशासनाकडून ही रक्कम अदा करण्यासाठी धडपड चालू आहे.
गावनिहाय कॅम्प सुरू केले आहेत. ई-केवायसी नसली तरी आता फार्मर आयडी शेतकऱ्यांसाठी गरजेचे आहे. यामुळे जाणकार शेतकरी आपला फार्मर आयडी ई-महासेवा केंद्र आणि प्रशासनाच्या शिबिरात जावून काढू लागले आहेत. मात्र अनेक अडाणी शेतकऱ्यांना या कामात यश आले नाही. यामुळे अशा शेतकऱ्यांचेे पैसे बँकांत पडले आहेत.