सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे अंदाजे 130 कोटी रुपये ऊस बिल थकविले आहे. त्यामुळे सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले. मंगळवारी (दि.26) पोलिसांनी मंडप उखडून टाकतो, असा दम शेतकऱ्यांना दिला. त्याला प्रत्युत्तर म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळाची जागा सोडून जिल्हा परिषदेच्या समोर रस्ता जाम करून आंदोलन सुरू केले.
शेतकऱ्यांच्या खात्यावर जोपर्यंत रक्कम जमा होणार नाही, तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाहीत, अशी माहिती आंदोलन शेतकरी अमोल पाटील यांनी दिली. यावेळी अरविंद घोडके, अंबादास शिवशंकर, सचिन जवळगे, प्रशांत सुरवसे, गणेश नरे, सचिन सपकाळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.