पंढरपूर : उसाला 3500 रुपये दर मिळावा, या मागणीसाठी ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने वाखरी पालखी तळ येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात शेतकरी संघटनांचा सक्रिय सहभाग आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी वाखरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर दुपारनंतर खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम महाराज साखर कारखान्यावर जाऊन आंदोलकांनी गव्हाणीत उड्या मारून ऊस गाळप बंद पाडले.
जोपर्यंत ऊस दर जाहीर केला जात नाही. तोपर्यंत येथून उठणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतल्याने कारखाना प्रशासनाने नमते घेत उसाला पहिले बिल तीन हजार रुपये जाहीर केले आहे. ऊस दर जाहीर केल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतल्याने सीताराम कारखान्याचे गाळप पुन्हा सुरळीत सुरु झाले. ऊसाला प्रतिटन 3500 रुपये दर मिळालाच पाहिजे. ऊस कोणत्याही वजनकाट्यावर वजन करून आणण्याची घोषणा सर्व कारखान्यांनी करावी, गाईच्या दुधाला 50 रुपये व म्हशीच्या दुधाला 80 रुपये प्रतिलिटर दर मिळावा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करावी, दोन साखर कारखान्यांमधील 25 किलोमीटरची हवाई अट रद्द करावी. या मागण्यांसाठी शेतकरी नेते समाधान फाटे हे सहकाऱ्यांसमवेत उपोषणाला बसले आहेत.
ऊपोषणाचा चौथा दिवस असल्याने उपोषणकर्त्यांची तब्येत ढासळू लागली आहे. शेतकरी संघटनांचे पदाधिकारी रास्ता रोको करत कारखान्यांचे गाळप बंद पाडू लागले आहेत. सीताराम महाराज साखर कारखान्यावर गुरुवारी दुपारी आंदोलकांनी गव्हाणीत उड्या मारत ठिय्या केला. जोरदार घोषणाबाजी केली. गाळप दोन तास बंद पाडले. यानंतर कारखाना प्रशासनाने पोलीसांना पाचारण केले. सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांनी कारखान्यावर उपस्थित राहीले. यावेळी कारखाना प्रशासनाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी राजलक्ष्मी गायकवाड यांनी पहिले बील तीन हजार रुपये जाहीर केले. या आंदोलनावेळी शेतकरी नेते सचिन पाटील, दिपक भोसले, माऊली जवळेकर, ॲड. दिपक पवार, संग्राम गायकवाड, निवास नागणे यांच्यासह आंदोलन व शेतकरी उपस्थित होते.