सोलापूर : जिल्ह्यातील 12 साखर कारखान्यांनी अद्याप ऊस दर जाहीर न केल्याने शेतकरी संघटनांनी एल्गार पुकारला आहे. रविवारी (14 डिसेंबर) ठिकठिकाणी रास्ता रोको, भजन आंदोलन करत, काही कारखान्यांतील गव्हाणीत उतरुन गाळप बंद पाडले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर-पुणे महामार्गावरील भीमानगर येथे रास्ता रोको आंदोलन केल्याने अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. प्रतिटनाला 3500 रुपये दर जाहीर करावी, वजन काट्याची चौकशी करावी यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन करून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. यावैळी सिद्धेश्वर घुगे, आदिनाथ परबत, हरिभाऊ माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते. बीबीदारफळ येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनहित शेतकरी संघटना या दोन्ही संघटनांनी गव्हाणीत उतरून गाळप बंद पाडले. उसाला पहिली उचल 3500 रुपये जाहीर करण्याची मागणी केली. यावेळी शेतकर्यांनी भजन करत कारखाना प्रशासनाचे लक्ष्य वेधून घेतले. यावेळी प्रभाकर देशमुख, विजय रणदिवे, अमोल पाटील यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दर जकराया शुगर कारखान्याच्या गव्हाणीत उतरून शेतकर्यांनी गाळप बंद पाडला.
जिल्ह्यात 34 साखर कारखाने असून यातील 22 कारखान्यांनी जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतर दर जाहीर केले आहेत. आतापर्यंत 3000 हजार रुपये प्रति टनांपर्यंत दर जाहीर केले आहेत. परंतू उर्वरित साखर कारखान्यांनी अद्याप दर जाहीर केलेला नाही. ऊस गाळप हंगाम सुरु होऊन चाळीस दिवस उलटून गेला आहे. ऊस गाळपास गेल्यानंतर 15 दिवसाच्या आत ऊस बिल शेतकर्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक आहे. यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकर्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहेत. आर्थिक परिस्थिती नाजूक बनल्याने 3500 रुपये प्रति टन ऊसास पहिली उचल देण्याची मागणी होत आहे.
ऊस दर जाहीर न केलेले कारखाने
सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना कुमठे, लोकमंगल शुगर इथेनॉल भंडारकवठे, लोकमंगल अॅग्रो बीबीदारफळ, लोकनेते बाबुराव पाटील अॅग्रो अनगर, श्री संत दामाजी मंगळवेढा, जयहिंद शुगर आचेगांव, युटोपियन शुगर्स मंगळवेढा, गोकुळ शुगर धोत्री, सिध्दनाथ शुगर तिर्हे, अतवाडे शुगरर्स लि.नंदूर, धाराशिव शुगर सांगोला, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.कारखाना भाळवणी, भिमा सह. कारखाना मोहोळ या कारखान्यांनी अद्यापही ऊस दर जाहीर केलेला नाही.