सोलापूर : शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाला चालना देण्यासाठी शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या माध्यमातून ५० टक्के अनुदानावर गाय म्हैस, शेळी मेंढी देणार आहे.
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना तसेच नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून पात्र शेतकरी, महिला बचत गट, अल्पभूधारक आणि सुशिक्षित बेरोजगारांना गाय, म्हैस, शेळी-मेंढी पालनासाठी अनुदानाचा लाभ दिले जाणार आहे.
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजनेअंतर्गत दोन दुधाळ देशी किंवा संकरीत गायी अथवा दोन म्हशींचा गट दिले जाणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना गटाच्या किमतीच्या ५० टक्के अनुदान, तर अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदान देण्याची तरतूद आहे. महिला बचत गटातील लाभार्थी, अल्पभूधारक आणि सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्य दिले जाते.
उपलब्ध विभागीय माहितीनुसार, एका गायीची किंमत सुमारे ७० हजार रुपये, तर म्हशीची किंमत ८० हजार रुपये गृहीत धरली आहे. दोन गायींच्या गटाची किंमत सुमारे १ लाख ५६ हजार ८५० रुपये, तर दोन म्हशींच्या गटाची किंमत सुमारे १ लाख ७९ हजार २५८ रुपये आहे. शेळीपालनाला चालना देण्यासाठी १० शेळ्या + १ बोकड अशा गटाचे वाटप करण्याची योजना आहे.
उस्मानाबादी आणि संगमनेरी शेळ्यांना प्राधान्य दिले जाते. या गटाची उपलब्ध विभागीय किंमत १ लाख ३ हजार ५४५ रुपये असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० टक्के आणि अनुसूचित जाती-जमातींसाठी ७५ टक्के अनुदानाची तरतूद आहे. या योजनेत दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार आणि महिला बचत गटातील लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाते.