सोलापूर : शेतात ट्रॉलीद्वारे खत टाकताना विजेचा धक्का बसून शेतमालक व शेतमजूर या दोघांचाही मृत्यू झाला. बसवराज पाटील (रा. हत्तूर), रवी नाईकवाडे (रा. आनंदनगर तांडा) अशी त्यांची नावे आहेत.
बसवराज पाटील हे हत्तूर जवळील आनंदनगर तांड्यांच्या रस्त्यावर असलेल्या शेतात खत टाकण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये खतासह चार मजुरांसह गेले. पाटील स्वतःच ट्रॅक्टर चालवत होते. शेतात ट्रॅक्टर डंपिंग करत खत खाली उतरवत असताना ट्रॉलीला विजेचा धक्का लागला. ही घटना गुरुवारी दुपारच्या दरम्यान हत्तूर येथे घडली आहे. ट्रॉलीलाच विजेचे धक्का बसल्याने पाटील हे जागीच बेशुद्ध पडले. जवळच असलेले रवी नाईकवाडे हे त्यांना उठवण्यासाठी जवळ गेले. हाताने त्यांना उठवत असताना नाईकवाडे यांनाही विजेचा धक्का बसला. तेही जागेवरच बेशुद्ध पडले. अन्य शेतमजुरांनी त्यांना काठीने बाजूला केले.
दोघांनाही बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाला. यात महेश कल्लप्पा हविलाळे हे जखमी झाले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची विजापूर नाका पोलिसांत नोंद झाली आहे.
आईचाही झाला होता मृत्यू
दोन वर्षांपूर्वी बसवराज पाटील यांची आई गौराबाई पाटील यांनाही विजेचाच धक्का बसला होता. यात त्यांचा मृत्यू झाला. मुलगा बसवराजही विजेच्या धक्क्याने मरण पावल्याची चर्चा ग्रामस्थ करत होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी, वडील असा परिवार आहे.