सोलापूर

Bogus seeds racket: राज्यातील बोगस बियाणांचा मास्टरमाईंड बार्शीत

कोट्यवधी रुपयांचे बोगस बियाणे अद्यापही बाजारपेठेत; पोलिसांपुढे शोधाचे आव्हान

पुढारी वृत्तसेवा
गणेश गोडसे

बार्शी : खरीप हंगामाच्या तोंडावर बार्शी तालुका कृषी विभागाने मोठी कारवाई करत बोगस उडीद बियाणे विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे 7 लाख 52 हजार 640 रुपये किमतीचे बोगस उडीद बियाणे जप्त करण्यात आले असून, हजारो शेतकऱ्यांची आर्थिक व पिकांची होणारी मोठी हानी टळली आहे. या बोगस बियाणांचा मास्टरमाईंड बार्शी तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंगळवारी दुपारी 4 वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला बार्शीत बोगस उडीद बियाणे विक्री होत असल्याची माहिती तालुक्यातील एका सतर्क खत बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारामुळे मिळाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले व कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पथक तयार करण्यात आले. उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डुवाडी संजय वाकडे यांच्या सूचनेनुसार जिल्हास्तरीय भरारी पथकाने स्वराज कॉलनी, कासारवाडी रोड येथील गाळा क्र. 3 वर छापा टाकला.

हा गाळा स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, शेळगाव (ता. परांडा, जि. धाराशिवचे प्रोपरायटर रत्नाकर रघुनाथ कोले यांनी भाड्याने घेतला होता. तपासणीत निर्मल सीड्स प्रा. लि., पाचोरा या कंपनीच्या ‌‘7 विश्वास‌’ या वाणाची हुबेहूब नक्कल केलेले बियाणे आढळले. गोडाऊनमध्ये 216 बॅग व यापूर्वी विक्री केलेल्या 168 बॅग अशा एकूण 384 बॅग (प्रत्येकी 5 किलो) नकली बियाणे मिळाले. प्रति बॅग 1960 रुपये दराने हे बियाणे विकले जात होते.

निर्मल सीड्सचे जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ भिमशेट्टी व तालुका प्रतिनिधी नितीन खटके यांनी या बॅगा बनावट असल्याचा लेखी जबाब दिला. कोड स्कॅन केल्यावर पीक, वाण, वैधता दिनांक, उगवणक्षमता याची कोणतीही माहिती दिसली नाही. सदर गाळ्याकडे बियाणे विक्री किंवा साठवणुकीचा परवानाही नव्हता.

कृषी अधिकारी व गुण नियंत्रण निरीक्षक किशोर अंधारे यांनी 26 मे 2026 रोजी रात्री उशिरा बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रत्नाकर कोले यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईत तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अतुल जाधव, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी बाळू बागल, सहाय्यक कृषी अधिकारी गणेश पाटील, राहुल मुंढे, अविनाश उघडे यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT