Online fraud Pudhari
सोलापूर

Solapur online fraud: ऑनलाईन बोगस कोर्स उत्तीर्ण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सोशल मीडियावर जाहिरात देऊन तरुणांना हेरायचा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मल्टी नॅशनल आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुणांना लागणाऱ्या विविध कोर्सचे प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या बहाण्याने बोगस कोर्सचे सर्टिफिकेट देणाऱ्या टोळीचा सोलापूर सायबर सेलने पर्दाफाश केला. याप्रकरणी अशपाक हेब्जुरहिमान अत्तार (वय 46, रा. राजस्व नगर) याला अटक केली.

आयटी कंपन्यांमध्ये तरुणांना बढती तसेच पगारवाढीसाठी विविध कोर्सच्या सर्टिफिकेटची गरज असते. हे ऑनलाईन कोर्स करुन त्या सर्टिफिकेटच्या आधारे अनेक तरुण बढती घेतात. अशा तरुणांना ऑनलाईन कोर्सचे प्रमाणपत्र देण्याच्या जाहिराती अशपाक हा सोशल मीडियावर करत होता. त्यातून तरुणांना हेरुन प्रमाणपत्र काढून देतो म्हणून बोगस प्रमाणपत्र देत होता. मागील दोन वर्षात त्याने तीन ते चार हजार तरुणांना अशी बोगस प्रमाणपत्रे दिली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अशपाक अत्तार हा मागील दोन वर्षांपासून हेस्ट सोल्युशन व अल्ट्रा इन्फोटेक या दोन्ही फर्म चालवत होता. त्याचे साथीदार अंकिता कोळी व ऐश्वर्या नल्ला तसेच इतर पाच ते सहा महिला व पुरुष यात काम करीत होते. आयटी कंपन्यांमध्ये जॉब करणाऱ्यांना कंपनीमध्ये प्रमोशनसाठी, पगारवाढीसाठी, इन्सेंटिव्ह मिळवण्यासाठी कंपनीमध्ये लागणाऱ्या विविध ऑनलाईन सर्टिफाईड कोर्सेसचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची परीक्षा बोगस मार्गाने उत्तीर्ण करत होता. अशपाक याच्या कार्यालयातून तसेच घरातून 12 लॅपटॉप, आठ सीपीयू, एक प्रोजेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरा, डीव्हीआर, मोबाईल व विविध बँकांचे चेक जप्त करण्यात आले.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त डॉ. आश्विनी पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली व. पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा, नागेश इंगळे, प्रवीण भोपळे, कृष्णात जाधव, निलेश गंगावणे, मच्छिंद्र राठोड, प्रकाश गायकवाड, आशिष गायकवाड, नानासाहेब काळे, सचिन अंबलगी, भाग्यश्री वाले यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT