पोखरापूर : पुढे पोलीसांची कार्यवाही चालू आहे, तुम्ही तुमच्या अंगावरील सोने काढून खिशात ठेवा. असे सांगत चार अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून निघालेल्या पती-पत्नीकडील ३ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना दि.१० मे रोजी सायंकाळी मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर घडली.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील लक्ष्मण दळवी व त्यांच्या पत्नी जयश्री असे दोघे मिळून दि. १० मे रोजी पाहुण्यांच्या लग्नकार्यासाठी मोटारसायकल वरून गेले होते. लग्नकार्य उरकून पोखरापुरला जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान मोहोळ शहराजवळील पंढरपूर रस्त्यावरील पेट्रोल पंपाचे पुढे १०० फुटावर दळवी यांची दुचाकी गेली असता, त्यांच्या पाठीमागून एक मोटारसायकल जवळ आली.
मोटार सायकलच्या पाठीमागे बसलेल्या अज्ञात इसमाने लक्ष्मण दळवी यांना मोटारसायकल रोडच्या बाजुला घ्या, आम्ही पोलीस आहोत, आमचे मोठे साहेब पुढे थांबलेले आहेत. तुमच्या अंगावरील सोने काढून खिशामध्ये ठेवा. त्याचवेळी पोखरापूरच्या दिशेने एक दुसरी मोटारसायकल आली. त्यांनीही दळवी यांच्याजवळ थांबलेल्या मोटारसायकलवरील इसमांना तुमचे खरे आहे, पुढे साहेब आहेत असे म्हणून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून खिशामध्ये घातली.
त्यावेळी दळवी पती-पत्नीला ही बातमी खरी असल्याचा विश्वास पटला. जयश्री दळवी यांनी त्यांच्या दोन्ही हातातील सोन्याच्या पाटल्या व गळयातील सोन्याचे नेकलेस काढून पती लक्ष्मण यांच्या हातात दिले. त्यावेळी पाठीमागून आलेल्या मोटारसायकलवरील इसमाने लक्ष्मण यांना तुमचे सोने मी कागदात बांधुन देतो, असे म्हणुन त्याचे हातात घेवून एका पांढऱ्या रंगाचे कागदात गुंडाळून लक्ष्मण दळवी यांच्याकडे देत दोन्ही मोटारसायकलीवरील चार अज्ञात इसम मोहोळच्या दिशेने निघून गेले.
त्यावेळी जयश्री यांनी पतीला त्यांनी कागदात बांधुन दिलेले सोने आपलेच आहे का पाहा? असे म्हणाल्यानंतर खिशातील पुडी बाहेर काढुन पाहिली असता त्यामध्ये सोने नसून पांढ-या रंगाचे दोन गोल कडे होते. त्यावेळी दळवी दांपत्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी अज्ञात चार चोरट्यांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.