SIR Mapping  pudhari photo
सोलापूर

SIR Extension Request: आषाढी वारीमुळे एसआयआरसाठी मागितली मुदतवाढ

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची माहिती; ३० जूनपासून घरोघरी जाणार बीएलओ

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : एसआयआर मोहिमेंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील व भरलेले अर्ज परत घेण्यात येणार आहे. घरोघरी भेट देऊन पूर्वमुद्रित फॉर्मद्वारे मतदारांची माहिती पडताळणी केली जाणार आहेत. परंतू सोलापूर जिल्ह्यात आषाढी वारीमुळे प्रशासकीय यंत्रणा वारी नियोजनात गुंतणार असल्याने मतदार यादी पुनरिक्षणासाठी (एसआयआर) नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ निवडणुक आयोगाकडे मागितल्याचे जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी सांगितले.

एसआयआर मोहिमेतंर्गत नाव, पत्ता, छायाचित्रे किंवा इतर तपशीलांमध्ये बदल असल्यास त्याची नोंद करता येणार आहे. तसेच पत्त्यावर उपस्थित नसलेले (अब्सेंट), स्थलांतरीत (शिफ्टेड), मयत (डेड) आणि डुप्लीकेट (एएसडीडी) प्रकारातील नोंदींची तपासणीही केली जाणार आहे.

सन २००२ ते २००४ मधील जुन्या मतदार याद्यांशी मॅपिंग उपलब्ध असल्यास अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता भासणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट केले. शासकीय निवासस्थानामध्ये वास्तव्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमाणपत्र घेवून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील शहरी भागात एकूण १०,८५,७४४ मतदारांपैकी २,७२,४५६ मतदारांचे म्हणजेच २५.०९ टक्के मतदारांचे मॅपिंग अद्याप राहिले आहे. ग्रामीण भागात ही टक्केवारी १०.४६ टक्के इतकी आहे. सोलापूर जिल्ह्यात एसआयआर मोहिमेंतर्गत ८५.५१ टक्के मॅपिंग पूर्ण झालेले आहे. उर्वरित १४.४९ टक्के काम पूर्ण करण्यासाठी ‘बीएलओं’ना सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच या संदर्भात लवकरच विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT