सोलापूर : रेल्वे स्थानकावर दुर्मीळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर पाहणी करतांना सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी सौनिक कल्याणचे अधिकारी मिलिंद तुंगारे, अतिरिक्त विभागीय रेल्वे प्रबंधक अंशुमाली कुमार, अंबादास यादव. Pudhari Photo
सोलापूर

Solapur Railway station : रेल्वे स्थानकावर स्वातंत्र्यलढ्यातील छायाचित्रांचे प्रदर्शन

एडीआरएम अंशुमाली कुमार यांच्याकडून उद्घाटन; रेल्वेचा उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : स्वातंत्र्यदिनानिमित्त मध्य रेल्वेचे विभागीय कार्यालय व सेंट्रल ब्यूरो ऑफ कम्युनिकेशन (सीबीसी) च्या प्रादेशिक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरच्या रेल्वे स्थानकावर अनोखे आणि प्रेरणादायी स्वातंत्र्य लढ्यातील दुर्मीळ चित्रांचे प्रदर्शन आयोजिले होते. हे चित्र प्रदर्शन शहरवासीयांसाठी खुलेही ठेवण्यात आले होते.

स्वातंत्र्य लढ्यातील दुर्मीळ चित्र प्रदर्शनाचे उदघाटन अतिरिक्त विभागीय रेल्वे प्रबंधक अंशुमाली कुमार व ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संयुक्तपणे केले. यावेळी वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी मच्छिंद्र गळवे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंजुनाथ, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, प्रादेशिक प्रचार अधिकारी अंबादास यादव, स्टेशन मॅनेजर व्ही. के. श्रीवास्तव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगारे, वीरेश नसले, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अरुणकुमार तलीखेडे, दिवाकर रेळेकर, बाळासाहेब खराडे व जे. एम. हनुरे यांची उपस्थिती होती. 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी दिवसभर हे चित्रपदर्शन सर्वांसाठी खुले ठेवले होते.

या दुर्मीळ छायाचित्रांचे ऐतिहासिक कथांद्वारे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची गाथा जिवंत वाटत होते. 1857 ते 1947 पर्यंतच्या काळात चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, असहकार व खिलाफत चळवळ, बारडोली सत्याग्रह, चौरी चौरा घटना, काकोरी ट्रेन अ‍ॅक्शन, चितगाव शस्त्रागार हल्ला, हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, सविनय कायदेभंग, दांडी यात्रा, भारत छोडो आंदोलन आणि फाळणीच्या घटना यासारख्या महत्त्वाच्या घटनांचे दुर्मीळ छायाचित्र या प्रदर्शनात नागरिकांना पाहता आले. तसेच ऐतिहासिक ठिकाणांची छायाचित्रे आणि कथा, राष्ट्रध्वजाची उत्क्रांती, येथील चार शहिदांचे शौर्य, भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीतील दुर्मीळ प्रतिमा देखील येथे प्रदर्शित केल्या होत्या. या प्रसंगाच्या आठवणी टिपण्यासाठी प्रेक्षकांसाठी एक सेल्फी बूथही उभारण्यात आला होता.

अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अंशुमाली कुमार म्हणाले की, इतिहास, देशभक्ती आणि अभिमानाचे समृद्ध असलेले हे प्रदर्शन नागरिक, विद्यार्थी आणि अभ्यागतांना भारताच्या गौरवशाली भूतकाळाशी जोडण्याची आणि राष्ट्राला आकार देणार्‍या बलिदानांचा सन्मान करण्याची एक विशेष संधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन हे कविता काजळे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT