File Photo
सोलापूर

राज्य उत्पादन शुल्क कोमात, अवैध दारू विक्री जोमात

सांगोला तालुक्यातील गावागावांतील चित्र; वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सांगोला : सांगोला शहरासह ग्रामीण भागातील गावोगावी विषारी हातभट्टी दारू विक्री सुरू आहे. त्याचबरोबर शिंदी विक्री व विना परवाना देशी-विदेशी दारू विक्रीही जोमात चालू आहे. या विषारी हातभट्टी दारूमुळे अनेकजण मरण पावले आहेत. तर अनेकजण मरणाच्या दारावर आहेत. अनेकांचे दारूमुळे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या अवैध दारू विक्रेत्यांवर किरकोळ कारवाई केली जाते, तर या पकडलेल्या किती दारू विक्रेत्यांवर कोणत्या विभागात गुन्हे दाखल होतात. हा संशोधनाचा विषय आहे.

अनेकवेळा महिन्यातून एकदा राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी खासगी गाडी घेऊन येतात. दारू विक्री करणार्‍यांना पकडतात. त्यांच्याकडून हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम घेऊन त्यांना त्याच ठिकाणी सोडून देतात. ही अवैध हातभट्टी दारू व विना परवाना देशी-विदेशी दारू विक्री राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी विभाग यांच्या आशीर्वादाने जोमात सुरू आहे. याचा त्रास महिला, सर्वसामान्य नागरिक यांना होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

सांगोला शहरासह ग्रामीण भागातील गल्ली-बोळात व्यावसायिकांनी हातभट्टी व देशी-विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. या विक्रेत्यांना हातभट्टी दारू पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील अनेक भागात पावडरपासून शिंदी बनवलेली तसेच हातभट्टीचे केंद्रही सुरू केले आहेत. ही हातभट्टी दारू युरिया काही रासायनिक व केमिकल वापरून तयार केलेली असते. त्यातच खराब गूळ, इतर रासायनिक केमिकल यामुळे या दारूचा उग्र वास येत असतो. तसेच ही दारू कसल्याही भांड्यात, बाटल्यात, डब्यात व ट्यूबमध्ये भरली जाते. यामुळे ही दारू विषारी झाली आहे. ही हातभट्टी दारू ओढ्याला, डोंगरदर्‍या, झाडी यामध्ये राजरोसपणे उत्पादन केली जाते. याकडे कोणाचेही लक्ष नाही.

तालुक्यामध्ये गावोगावी एक ते पाच ठिकाणी गल्ली-बोळात अवैध देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने थाटली आहेत. या दुकानदारांना राजरोसपणे दिवसा व रात्री चारचाकी, दुचाकी गाडीवरून देशी व विदेशी दारूचे बॉक्स पोच केले जातात. हा व्यवसाय सध्या राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने मोठ्या धुमधडाक्यात चालू आहे. या अवैध व्यवसायामुळे सर्वसामान्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तर अनेक लोक मरणही पावले आहेत. याला आशीर्वाद कोणाचा हा संशोधनाचा विषय आहे. जादा दराने दारुची विक्री होत आहे. तर विदेशी दारूही बनावट असल्याची चर्चा आहे. शिंदीची बाटली 30 रुपयाला तर हातभट्टी दारूची बाटली केवळ 20 रुपयाला मिळते. ही दारू स्वस्त मिळत असल्याने तलफ भागविण्यासाठी सर्वसामान्य दारू पिणार्‍यांनाही परवडते. पण ही हातभट्टी दारू विषारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT