सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे सर्वांना समान मताचा अधिकार दिला. परंतु ईव्हीएममधील घोटाळ्यांमुळे हा संवैधानिक अधिकार धोक्यात आला आहे. ईव्हीएमद्वारे मतांमध्ये फेरफार करून लोकशाहीला धोका निर्माण होत आहे. ज्यामुळे हुकूमशाही येण्याची भीती आहे. भाजप नागनाथ तर काँग्रेस सापनाथ आहेत. दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. ते दोघे वंचित समाजाच्या हिताचे नाहीत. त्यांच्यापासून वेगळे राहून केवळ वंचितांची सत्ता स्थापन करणे हाच उद्देश असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.
आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 23) काढलेल्या जन आक्रोश मोर्चात ते बोलत होते. ईव्हीएम घोटाळ्याचा आणि अनुसूचित जाती-जमातींच्या निधीच्या गैरव्यवहाराबाबत हा मोर्चा काढला. राजमाता अहिल्यादेवी होळकर, चार हुतात्मा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना आंबेडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर हलगीच्या निनादात घोषणा देत मोर्चा निघाला.
श्री सिद्धेश्वर प्रशालेमार्गे पूनम गेट येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी सुजात आंबेडकर, डॉ. नितीन ढेपे, सोमनाथ साळुंखे, अरुण जाधव, अमोल लांडगे यांची भाषणे झाली. यावेळी चंद्रशेखर मडीखांबे, प्रशांत गोणेवार, अण्णासाहेब वाघमारे, शारदा गजभिये, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, विक्रांत गायकवाड, अनिरुद्ध वाघमारे, विजयानंद उघडे, अतिश बनसोडे, शाहिद शेख उपस्थित होते.