Pudhari File Photo
सोलापूर

पंढरीत अतिक्रमणावर हातोडा

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिम

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने पंढरीत प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली. आषाढीच्या पार्श्वभूमीवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलिस बंदोबस्तात नगरपालिका इमारत ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, तसेच संत गजानन महाराज मठ परिसरातील अतिक्रमणे जेसीबी लावून काढली. त्यामुळे येथील नेहमी अतिक्रमनात दाटलेल्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. याचे भाविकांनी स्वागत केले. मात्र, या कारवाईवर व्यापार्‍यांनी नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्दे

पंढरपूर नगरपालिका, पोलिस प्रशासन, बांधकाम विभागाची संयुक्त कारवाई

अतिक्रमित दुकानावरील पत्रे, टपर्‍या उद्ध्वस्त

शहरात सर्वत्र अतिक्रमण हटाव मोहीम राबविणार

दुजाभाव होत असल्याचा व्यापार्‍यांचा आरोप

आषाढीच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली आहे. आषाढी यात्रेला 15 ते 18 लाख भाविक येतील, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी असणारी अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. नगरपालिकेने गुरुवारी सकाळी पोलीस प्रशासनासह प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमण काढले. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, डीवायएसपी अर्जुन भोसले, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह 100 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी, जेसीबी आणि टेम्पोसह रस्त्यावर उतरुन अतिक्रमणावर कारवाई करत होते.

नरगपालिका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरील व्यापार्‍यांनी दुकानांच्या पुढे पाणसळ लावले होते. पत्रे उभा करुन दुकाने, टपर्‍या वाढवल्या होत्या. व्यापार्‍यांनी लोखंडी शटरही बाहेर काढली होती. या व्यापार्‍यांना अतिक्रमण काढण्याच्या सुचना नगरपालिका प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र, व्यापार्‍यांनी अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे ही कारवाई करावी लागत असल्याचे प्रशासनाने सांगितले. शहरातील सर्वच भागात अतिक्रमणाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येते. दरम्यान, एकाबाजूला पंढरपूर शहरात प्रत्येक प्रमुख मार्गावर राजकीय आशीर्वादाने शेकडो खोके, टपर्‍या आणि कार्यालये अतिक्रमण करुन सुरु आहेत. यावर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवत नाही. गोरगरीब व्यापार्‍यांच्या दुकानावरील पत्रे, टपर्‍या उध्वस्त करत असल्याची व्यापारी चर्चा करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT