सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात गणेशोत्सवानिमित्त संगीत खुर्ची, तळ्यात-मळ्यातसारखे खेळ कर्मचारी ‘ऑन ड्युटी’ खेळत बसल्याने बुधवारी (दि. 3) स्थानिक सोडा परगावाहून आलेल्या एकाही विद्यार्थ्याचे काम झाले नाही. या प्रकारामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना वार्यावरच सोडल्याचे दिसून आले. या प्रकाराविषयी बरीच उलट-सुलट चर्चा सुरू झाल्यावर कुलसचिव अतुल लकडे यांनी सारवासारव करत, शासनाच्या नियमानुसार विद्यापीठात गणेशोत्सव साजरा होत आहे. कर्मचार्यांच्या स्पर्धेदरम्यान एकाही विद्यार्थ्याची तक्रार आलेली नाही, असे सांगितले.
गणेशोत्सवानिमित्त विद्यापीठात बुधवारी (दि. 3) कर्मचार्यांनी ‘ऑन ड्युटी’ संगीत खुर्ची आणि तळ्यात-मळ्यात यासारखे खेळ खेळले. यामुळे कार्यालये ओस पडली. कर्मचारी या खेळांमध्ये इतके रममाण झाले की, बार्शी, अकलूज आणि सांगोल्यासह पूर्ण जिल्हाभरातून कामानिमित्त आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालकांकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष झाले. यामुळे त्यांचा पूर्ण दिवस, येण्याजाण्याचा खर्च वाया गेला.
विद्यापीठातील कर्मचार्यांच्या या ‘तळ्यात-मळ्यात’ भूमिकेमुळे त्यांच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या प्रकारामुळे विविध संघटनांमध्येही तीव्र संतापाचे वातावरण आहे. विद्यापीठात कामांना प्राधान्य देणे अपेक्षित असताना कर्मचार्यांचे ‘तळ्यात-मळ्यात’ सुरू असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विद्यापीठाने परिपत्रकाची जरूर अंमलबजावणी करावी; परंतु त्यांची ठरवून दिलेली कामे प्राधान्याने करावीत. परगावाहून आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालकांना मनस्ताप झाला. यापुढे असे झाल्यास आम्ही आंदोलन करू.- आतिश बनसोडे, अध्यक्ष, युवा पँथर सामाजिक संघटना