बार्शी : उपळाई ठोंगे (ता. बार्शी) येथील बनावट डॉक्टरच्या इंजेक्शनमुळे एका ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात शंकर मनोहर पाठक या बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी गोविंद तानाजी सुतार (रा. विश्वासनगर, उपळाई ठोंगे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वडील तानाजी नरहरी सुतार (वय ६०) यांना कंबरेची करक भरल्याने गावातील शंकर मनोहर पाठक यांच्याकडे नेण्यात आले होते. पाठक यांनी दिलेल्या इंजेक्शननंतर तानाजी सुतार यांना गाठ येऊन त्रास सुरू झाला. त्यांच्यावर बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. फिर्यादीने गावात चौकशी केली असता, डॉ. शंकर पाठक यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी, शिक्षण किंवा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. ते विनापरवाना गावातील रुग्णांवर उपचार करत असल्याची खात्री पटल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
मयताच्या मृत्यूचे नेमके कारण व वैद्यकीय अभिप्रायासाठी कागदपत्रे जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर यांच्याकडे पाठवली होती. मात्र त्यांच्याकडून विलंब होत असल्याने अखेर फिर्यादीने थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव करीत आहेत.