सोलापूर

Maharashtra Water Crisis: यंदा एल निनोमुळे राज्यात पाणी संकटाची भीती

१५६ बंधाऱ्याची होणार तातडीने दुरुस्ती; १५१ कोटींचा निधी मंजूर

पुढारी वृत्तसेवा
संगमेश जेऊरे

सोलापूर : यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील प्रमुख धरणांत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला असून, अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा पाऊस कमी असल्याने एल निनोचे संकट आहे. येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी पाणी साठा उपलब्ध व्हावा, म्हणून राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्यावतीने तातडीने १५६ कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी १५१ कोटी ९३ लाख रुपये निधींची तरतूद केली आहे. येत्या १५ सप्टेंबरपूर्वी म्हणजे पावसाळा संपण्यापूर्वी हे बंधारे दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहे.

राज्यात एल निनोच्या परिणामामुळे दुष्काळसदृश परिस्थितीची शक्यता आहे. पिण्याचे व जनावरांना पाणी उपलब्ध करण्यासाठी संरक्षित सिंचनाच्या उपाययोजना करुन पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात अडवून जमिनीत मुरविणे व त्याची साठवणूक करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. त्याबाबत २२ जुलै रोजी शासकीय निर्णय जारी केला आहे. जलसंपदा विभागांतर्गत महामंडळाकडून १५६ नादुरुस्त कोल्हापूर बंधारे तातडीने दि.१५ सप्टेंबरपूर्वी दुरुस्त करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. जलसंपदा विभागांतर्गत महामंडळनिहाय एकूण ९७५ कोल्हापूर बंधारे असून त्यापैकी १५६ बंधारे तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. एकूण ९७५ बंधाऱ्यांपैकी तांत्रिकदृष्ट्या शक्य असलेल्या ठिकाणी इलिप्टिकल बंधाऱ्यात रूपांतरित करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

छोट्या स्वरुपाच्या दुरुस्तीची कामे १५ सप्टेंबरपर्यंत तर मोठ्या स्वरुपाच्या दुरुस्तीची कामे दि.3० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून घेण्यात यावीत. जी कंपनी त्यांना दिलेली कामे १५ सप्टेंबरच्या किंवा ३० ऑक्टोबर मुदतीत पूर्ण करू शकणार नाही, त्यांना देय होणाऱ्या देयकाच्या रकमेतून २० टक्के दंड लावण्याची तरतूद निविदा अटीत ठेवण्यात यावी. ज्या एलिप्टिकल बंधाऱ्यांमध्ये रूपांतरित करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे, त्याठिकाणी कामे हाती घेण्यात यावीत, अशा सूचना दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT