करमाळा : जिल्हा परिषद -पंचायत समिती, नगर परिषद निवडणुका माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले.
उपमुख्यमंत्री शिंदे पंढरपूर दौर्यावर आले असताना माजी आमदार जयवंतराव जगताप , जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यासोबत करमाळा नगरपालिकेतील माजी नगरसेवकांनी व अन्य पदाधिकार्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.दोन वेळा आमदार असलेले माजी आमदार जयवंतराव जगताप शिवसेनेत आल्यामुळे करमाळा तालुक्यातील शिवसेना मजबूत झाली असून येणार्या जिल्हा परिषद -पंचायत समिती नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून करमाळा तालुक्यावर शिवसेनेचा भगवा फडकावा अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या .
यावेळी माजी आमदार जगताप म्हणाले की, करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेना मजबूत करणार असून येणार्या सर्व निवडणुका धनुष्यबाणावर लढवल्या जाणार आहेत.लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पन्नास हजार शिवसैनिकांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा घेणार आहे.करमाळा शहरातील विविध विकास कामांसाठी 21 कोटी रुपयांच्या निधी मागणीचे पत्र माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी एकनाथ शिंदे यांना यावेळी दिले.