पंढरपूर : श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.  Pudhari Photo
सोलापूर

Eknath Shinde | संतांचे विद्यापीठ म्हणजे संत नामदेव महाराज

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपुरात श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने सन्मान

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : संतांचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे संत नामदेव महाराज आहेत. संत नामदेव महाराज यांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्राबाहेर नेली, रुजवली व वाढवली. त्यामुळे वारकर्‍यांना देशभर प्रतिष्ठा आहे. वारीच्या माध्यमातून देशभरातून लाखो भाविक पंढरपुरात येतात आणि त्यांच्या सुख, समृद्धी व सेवेसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या 675 वा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज यांच्या वंशजांकडून संत नामदेव महाराज मंदिर येथे प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी आ. समाधान आवताडे, आ. अभिजित पाटील, आ. उत्तमराव जानकर, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार जयवंत जगताप, सकल संत वंशज तथा संत समाधी संस्थान प्रमुख, विश्वस्त, फडकरी, ज्येष्ठ कीर्तनकार उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, संत नामदेव महाराजांच्या जन्मभूमीवर पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. तसेच हा पुरस्कार वैयक्तिक सन्मान मानण्याऐवजी सहकार्‍यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ म्हणून स्वीकारल्याची भावना व्यक्त केली. हा पुरस्कार कोणत्याही पदापेक्षा मोठा असल्याचे त्यांनी म्हटले. शेतकरी व वारकरी यांचा विकास हे प्राधान्य असून संत नामदेवांच्या शिकवणीप्रमाणे तळागाळातील प्रत्येकाचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे. शासन धार्मिक अधिष्ठानास राजकीय अधिष्ठानापेक्षा प्राधान्य देत असून, महाराष्ट्रातील तमाम साधू-संतांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे.

इतिहासात प्रथमच वारकर्‍यांच्या दिंड्यांसाठी शासनाने अनुदान जाहीर केले असून विमा सुरक्षा, आरोग्य तपासणी शिबिरे, शुद्ध पाणी, निवास, स्वच्छता इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हा सगळा विकास लोकांना विश्वासात घेऊन आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने होत असल्याचेही त्यांनी सांगितले. अक्षय महाराज भोसले यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, राणा महाराज वासकर यांनी आपले विचार व्यक्त केले.

पहिलाच पुरस्कार ना. शिंदे यांना प्रदान

नामदेव महाराजांचे वंशज यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी त्यांना पगडी, वीणा तसेच सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या संस्थेच्यावतीने देण्यात आलेला श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज हा पहिलाच पुरस्कार शिंदे यांना देण्यात आलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT