Eknath Shinde Helicopter Technical Snag
पंढरपूर : कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी (दि.१९) दुपारी हेलिकॉप्टरने पंढरपुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग आणि पत्राशेड परिसराची पाहणी करून भाविकांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती घेतली. तसेच प्रशासकीय आढावा बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
पाहणी आणि आढावा बैठक आटोपल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास उपमुख्यमंत्री शिंदे मुंबईकडे रवाना होण्यासाठी हेलिपॅडवर पोहोचले. मात्र, यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते बंद पडले. त्यामुळे हेलिकॉप्टरने मुंबईला जाण्याचा नियोजित दौरा बदलावा लागला. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले.