सोलापूर

Onion Prices : इजिप्तच्या कांद्याची धास्ती; आवक वाढली, दर घसरले

कर्नाटकातील भिजलेला कांदाही बाजारात; व्यापाऱ्यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : इजिप्तहून आयात झालेला कांदा भारतात दाखल झाल्याने स्थानिक बाजारात कांद्याच्या दरात घसरण होण्याची धाकधूक शेतकऱ्यांमध्ये वाढली. तसेच कर्नाटकात झालेल्या पावसामुळे भिजलेला नवीन कांदाही बाजारात दाखल झाला आहे. या दोन्ही कारणांमुळे सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

बाजार समितीत सोमवारी १६ हजार ६६७ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. शुक्रवारी ही आवक वाढून १७ हजार १७५ क्विंटल झाली. चार दिवसांत आवकेत ५०८ क्विंटलने वाढ झाली आहे.सोमवारी कांद्याला कमाल ६ हजार रुपये, सरासरी ३ हजार ३०० रुपये आणि किमान ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. शुक्रवारी कमाल दर ५ हजार ५०० रुपयांवर आला. त्यामुळे कमाल दरात ५०० रुपयांची घट झाली. सरासरी दरही ३ हजार ३०० रुपयांवरून २ हजार ९०० रुपयांवर आला असून, त्यात ४०० रुपयांची घट झाली. किमान दर मात्र ५०० रुपये कायम राहिला.

कर्नाटकात भिजलेला कांदा विजयपूर जिल्ह्यातून सोलापूर बाजारात विक्रीसाठी येतो. सध्या कर्नाटकात पाऊस झाल्याने भिजलेला नवीन कांदा बाजारात येत आहे. त्यामुळे नवीन कांद्याच्या दरात काहीशी घसरण झाली.नवीन मालाच्या तुलनेत जुन्या कांद्याला चांगला भाव असल्याचे सांगितले.

इजिप्तचा कांदा मुंबईत दाखल

सण-उत्सवाच्या काळात कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाने आयातीला परवानगी दिल्यानंतर इजिप्तहून सुमारे ६० टन कांदा मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाला. आयात कांद्याला ३८ ते ४० रुपये किलो, तर देशी कांद्याला ३० ते ४८ रुपये किलो दर मिळाला आहे.

किरकोळ बाजारात कांदा ५० ते ६० रुपये किलो

घाऊक बाजारात कांद्याच्या कमाल आणि सरासरी दरात किंचित घट झाली असली, तरी किरकोळ बाजारात कांद्याचे दर चढेच आहेत. सोलापूर शहरातील किरकोळ बाजारात कांदा सध्या ५० ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारातील दरातील तफावत कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT