सोलापूर : राज्यातील एकल मातांची मुले शिक्षणापासून दूर जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शासनाकडून आता एकल मातांच्या दोन लाख 23 हजार मुलांचा शैक्षणिक खर्च करण्यात येणार आहे. त्याची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
एकल मातांच्या मुलांना शिक्षणामध्ये अधिक सुविधा देण्याच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रथमच अशा विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यानुसार राज्यात एकल मातांची एकूण 2 लाख 23 हजार 42 मुले पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात सर्वाधिक 14 हजार 367 मुले नाशिक जिल्ह्यातील, तर नागपूर जिल्ह्यात सर्वांत कमी 1 हजार 8 मुले आहेत.
राज्यातील एकल मातांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती खूप बिकट आहे. एकल मातांना मुलगा, मुलींचे शिक्षण करणे खूप कठीण जाते. त्यामुळे अनेकदा अशा मुलांना शिक्षण मध्येच सोडावे लागत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते बारावीपर्यंतच्या अशा मुलांचे सर्वेक्षण करून जिल्हानिहाय आकडेवारी सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यातील दोन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी सापडले आहेत.