मंगळवेढा : तालुक्यातील उचेठाण येथील जैन हरिजन वस्ती या शाळेतील एक शिक्षक सेवानिवृत्त झाले तर एका शिक्षकाची बदली झाली. त्यामुळे ही शाळा शिक्षकाविना असून शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा अडचणीचा केला आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा पाया हा प्राथमिक शिक्षणातून याच शिक्षणाचा सध्या तालुक्यात कारभार रामभरोसे आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. उचेठाण येथे चार प्राथमिक शाळा असून त्यापैकी एका प्राथमिक शाळेतील शिक्षक 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले तर दुसर्या शिक्षकाची नुकतीच बदली झाली आहे. त्यामुळे या शाळेत शिक्षक नाहीत. सध्या शिक्षण विभागाने दुसर्या शाळेवरील शिक्षक आलटून पालटून पाठवून शिकवण्यासाठी व्यवस्था केली आहे.
तालुक्याजवळील शाळेसाठी शिक्षकांची पसंती असल्याने सीमावर्ती भागात शिक्षक जाण्यास तयार नाहीत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी शहरात खासगी वाहनातून येत आहेत. नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद शाळेच्या निवडक शाळामधील विद्यार्थ्यांनी डंका वाजवला. परंतु, सध्या शिक्षकांच्या रिक्त पदामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
एका बाजूला जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या टिकावी, म्हणून काही ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीचे कर माफ करण्याचा निर्णय घेतला. तर दुसर्या बाजूला शिक्षण विभागच शिक्षकांचे रिक्त पदे ठेवून गाव ग्रामपंचायतच्या प्रयत्नाला एक प्रकारे छेद दिला जात आहे. तालुक्यामध्ये काही शाळांचा समावेश पीएमश्री योजनेमध्ये आहे. त्याही शाळांची कामे सध्या अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे त्या शाळेची पटसंख्यादेखील चिंताजनक आहे.
तालुक्यामध्ये 13 केंद्रातील शाळात शिक्षकांची 490 पदे, पदवीधर शिक्षक 72 आणि मुख्याध्यापकाची 71 पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या तालुक्यात 457 शिक्षक, पदवीधर शिक्षक 69, तर मुख्याध्यापक 24 कार्यरत आहेत. सध्या 39 शिक्षकाची पदे रिक्त आहेत, 11 पदवीधर शिक्षक आणि 7 मुख्याध्यापकाची पदे रिक्त आहेत.
शिक्षण विभागाने रिक्त पदे भरण्यासाठी निर्णय तातडीने घ्यावा अन्यथा पालक व विद्यार्थी याबाबत आक्रमक होतील. या विभागाला त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. यात आम्ही पालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. शाळा चालू देणार नाही.- अॅड. राहुल घुले, शहराध्यक्ष काँग्रेस मंगळवेढा