सोलापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकसंदर्भात भाजप-शिवसेना युतीचा निर्णय घेण्याचेअधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत. बुधवारी (दि. 21) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. त्यापूर्वी शिवसेना आणि भाजप युतीचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती शिवसेना नेते तथा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. भाजप आणि शिवसेना युतीसंदर्भात शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (दि. 20) बंद खोलीत मंत्री भुसे यांनी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री भुसे म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी भाजपसोबत युती करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवावे असे आदेश जिल्हाप्रमुखांना देण्यात आले आहेत. यावेळी संपर्कप्रमुख तथा माजी आ. संजय कदम, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आ. शहाजी पाटील, प्रदेश प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, महेश साठे, अमर पाटील, मनीष काळजे, शहर प्रमुख सचिन चव्हाण, संजय कोकाटे, महेश चिवटे, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे उपस्थित होते.
मार्गदर्शनासाठी नगरसेवकांना ठेवले हॉटेलवर
मुंबई महापालिका निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आलेल्या नगरसेवकांकडून विकासकामांची मोठी अपेक्षा आहे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हॉटेलमध्ये ठेवले आहेत. त्याचे उत्तर एकदा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. त्यामुळे या गोष्टीवर जास्त बोलणे महत्त्वाचे नसल्याचे स्पष्टीकरण मंत्री भुसे यांनी दिले.