सोलापूर ः सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सन 2025-2026 अंदाजपत्रकीय बैठकीची लगबग प्रशासनात दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी आयुक्तांनी पाच विभागांचा आढावा घेतला आहे. 31 जानेवारीपर्यंत या आढावा बैठकांचा सिलसिला चालू राहणार आहे.
मार्च महिना आला की महापालिका प्रशासनास बजेटचे वेध लागतात. त्या पार्श्वभूमीवर सध्या महापालिकेत बजेटची लगबग दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षातील बजेट सादर करण्यापूर्वी महिनाभर अगोदर अंदाजपत्रक आढावा बैठका घेतल्या जातात. दि. 27 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत या बैठका घेतल्या जाणार आहेत. या बैठकांमध्ये विविध विभागांचा आढावा महापालिका आयुक्त घेणार आहेत. दि.27 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये भूमी मालमत्ता विभाग, नगर रचना, घनकचरा व्यवस्थापन, मंडई विभागाचा आढावा घेत जमा आणि खर्चाच्या बाजूची पडताळणी करण्यात आली.
दि. 28 जानेवारी रोजी नगर अभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियंता, अग्निशामक दल, दि.29 जानेवारी रोजी विद्युत विभाग, उद्यान विभाग, पशुवैद्यकीय आणि प्राणीसंग्रहालय सर्व झोन कार्यालय, दि. 30 जानेवारी रोजी नगरसचिव, कामगार कल्याण व दिव्यांग विभाग, महिला बालकल्याण विभाग, संगणक विभाग, सामान्य प्रशासन, भांडार विभाग, शिक्षण विभाग, विधान सल्लागार विभाग, सुरक्षा विभाग आदींचा आढावा घेतला जाणार आहे.