सोलापूर : जगभरातील ख्रिस्ती बांधव ईस्टर संडे उत्साहाने साजरा करत असतात. हा दिवस येशू ख्रिस्ताच्या मरणावर विजय आणि पुनरुत्थानाचा स्मरणोत्सव आहे, जो ख्रिस्ती विश्वासाचा केंद्रबिंदू मानला जातो. शहरातील विविध चर्चेसमध्ये पहाटे साडेसहा वाजल्यापासून विशेष प्रार्थना, भक्ती आणि आनंदी गीतांनी उपासना सुरू होते.
ईस्टर संडे हा येशू ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळवून कबर रिकामी केल्याचा आनंदाचा क्षण आहे. ख्रिस्ती विश्वासानुसार, येशू ख्रिस्त स्वर्गात जिवंत आहे आणि तो पुन्हा दुसर्यांदा न्यायासाठी येणार आहे. या विश्वासातून विश्वासणार्यांना मरणानंतर अनंतकालीन जीवनाची आशा दिली जाते. येशूच्या पुनरुत्थानाच्या संदेशासह, भक्त मंडळी एकमेकांना ईस्टरच्या शुभेच्छा देत, गीत गात आणि आनंद व्यक्त करत असतात.
ईस्टरचा सण गुड फ्रायडेच्या स्मरणानंतर येतो, ज्या दिवशी येशू ख्रिस्त मानवाच्या पापांसाठी वधस्तंभावर बलिदान झाला. त्याने सैतान आणि मृत्यूवर विजय मिळवून तारणाचा मार्ग खुला केला. याच प्रतीकात्मक विजयाचा उत्सव म्हणून ईस्टर साजरा केला जातो.
शहरातील ख्रिस्ती मंडळींमध्ये सकाळपासूनच प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तजन आनंदाने एकत्र येऊन, येशूच्या पुनरुत्थानाच्या संदेशाचा प्रसार करत आहेत. देवाचे पुनरुत्थान ही आनंदाची आणि महत्त्वाची बाब आहे, असे एका भक्ताने सांगितले. ईस्टरच्या शुभेच्छा आणि गीतांद्वारे सर्वजण हा सण उत्साहात साजरा करण्यात येतो.