सोलापूर : मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी पदयात्रा आणि भव्य रॅलींवर भर दिला असून, त्यात गर्दी दाखवण्यासाठी लाडक्या बहिणींना साद घातली आहे. शहरातील विविध प्रभागांत सकाळी आणि संध्याकाळी निघणार्या रॅलींमध्ये सहभागी होणार्या महिलांची सध्या मोठी चांदी होत आहे. रॅलीत सहभागी होण्यासाठी प्रत्येक महिलेला रोज पाचशे रुपये व एकवेळेचे जेवण दिले जात आहे.
हातावर पोट असलेल्या या महिलांसाठी निवडणुकीचा काळ रोजगाराची नवीन संधी आणि सुखी दिवसांची पर्वणी ठरत आहे. आपली रॅली किती भव्य आहे, हे दाखवण्यासाठी उमेदवारांमध्ये मोठी चढाओढ लागली आहे. रिक्षावरील भोंगे आणि पक्षांच्या गाण्यांच्या तालावर झेंडे घेऊन महिला उत्साहाने सहभागी होताना दिसत आहेत.
निवडणुकीत उमेदवारांनी गर्दीसाठी नवा फंडा शोधला आहे. एका कार्यकर्त्याला किमान दहा महिला जमवण्याचे टार्गेट दिले जात असून, रॅली आणि जेवण संपल्यानंतर नोंद तपासून कार्यकर्त्यामार्फत रोख पैसे दिले जात आहेत. या कॅश फॉर्म्युलामुळे प्रचारात राजकारणासोबतच मोठ्या प्रमाणावर अर्थकारण आणि चढाओढ पाहायला मिळत आहे.
निवडणूक रॅलींमध्ये महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सकाळचा नाश्ता - यामध्ये पोहे, उप्पीट तर दुपारचे जेवण आणि रात्री रोख रकमेचे वाटप केले जात असल्याचे चित्र आहे. यामुळे महिलांची चांदी होत आहे. विशेष म्हणजे गर्दीच्या ठिकाणी व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून कार्यकर्त्यांनी महिलांना स्वतःची पाण्याची बाटली सोबत आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.